मास्क, सॅनिटायझरसाठी ५० लाख रुपये आमदार निधीतून खर्च करण्याची परवानगी

नाशिक : महाराष्ट्रासह देशभरात दिवसेंदिवस कोरोना विषाणू संसर्गाचा विळखा घट्ट होत चालला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन देशात लॉकडाऊन केले आहे. मात्र त्या नंतरही नवनवीन शहरांत आणि ग्रामीण भागांतही कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. चीन, इटली, अमेरिका या देशांमध्ये कोरोनाचा धुमाकूळ सुरू असतानाच, भारतातही आता त्याने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. केरळनंतर कोरोनाचे सर्वाधिक महाराष्ट्रात आढळले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य प्रशासन आणि पोलीस विनाकारण घराबाहेर पडू नका, घरीच राहा, मास्क वापरा. गर्दीच्या ठिकाणी जाने टाळा, असे आवाहन करत आहेत. अशातच आता कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत असताना आता सॅनिटायझर, मास्क, औषध फवारणी, मेडिकल सुविधा, गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आमदारांना ५० लाख रुपये आमदार निधीतून खर्च करण्यासाठी परवानगी राज्य सरकारने दिली आहे. अशी माहिती भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत त्या बोलत होत्या.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा १५९ वर गेलाय. तर संपूर्ण देशात ८०० हून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. राज्यात सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन असले तरीही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु राहणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच आगामी १५ ते २० दिवस आपल्यासाठी अत्यंत कसोटीचे असून या काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे आता नागरिकांनी कृपा करून घराबाहेर पडूच नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.