fbpx

तेलतुंबडेंच्या प्रकरणावरून संतप्त प्रकाश आंबेडकरांचे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून डॉ. आनंद तेलतुंबडेला आज पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती.याच मुद्द्यावरून भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असून सरकार विरोधातील आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असून सरकार विरोधातील आवाज दाबण्याचा हा प्रयत्न करत आहे. तेलतुंबडे यांच्या हेतूवर शंका घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. केवळ चुकीचा हेतू होता म्हणून अटक करणं याला काही अर्थ नाही. काही कृतीच घडली नसेल तर हेतूला अर्थ उरत नाही.एल्गार परिषदेविरोधात सर्वात आधी तेलतुंबडे यांनीच लिहिलं होतं. एल्गार परिषदासारख्या परिषदा घडू नयेत असं तेलतुंबडे यांनी म्हटलं होतं.

कोण आहेत आनंद तेलतुंबडे ?
आनंद तेलतुंबडे हे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बहिणीचे पती आहेत. ते दलित चळवळीतील आघाडीचे विचारवंत आहेत. त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावात झाला. त्यांनी नागपूरमधील विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं.

काही काळ नोकरीत घालवल्यावर त्यांनी IIM अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी अनेक विषयावर संशोधन केलं.त्यांनी IIT खरगपूरलाही अध्यापन केलं असून सध्या ते गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत 26 पुस्तकं लिहिली असून अनेक वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये स्तंभलेखन केलं आहे. त्यांचे अनेक शोधनिबंधही प्रकाशित झाले आहेत. कॉर्पोरेट क्षेत्राबरोबर त्यांनी सामाजिक चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.