मुंडेंवरील आरोप गंभीर… शरद पवारांची महत्वाची प्रतिक्रिया

sharad pawar and dhananjay munde

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.

मात्र, भाजपने त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रीपद सोडावं या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर अशातच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

आता धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. कालपासून त्यांनी अनेक बड्या नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या आहेत. आता हे वृत्तसमोर येताच राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. तर, कालच धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती.

मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरबाहेर शरद पवार यांनी मुंडेंवरील आरोपांवर भाष्य केलं आहे. ‘धनंजय मुंडे यांनी मला भेटून या प्रकरणातील त्यांची बाजू मांडली आहे. त्यांनी आरोपांची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. यातून त्यांच्यावर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले व असे आरोप होतील याची त्यांना कल्पना होती त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन आपली भूमिका मांडली आहे,’ असं ते म्हणाले.

तर, ‘त्यांच्यावरील आरोपांचं स्वरूप हे गंभीर आहे. यावर आम्हाला पक्ष म्हणून निर्णय करावा लागेल. पक्षातील प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन याविषयी निर्णय केला जाईल. मुंडेंनी मला सखोल माहिती दिली असून इतर सहकाऱ्यांना ती सांगून त्यांचे मत घेणं हे माझं कर्तव्य आहे. लवकरात लवकर यावर पुढील पावले उचलली जातील’ अशी माहिती देखील शरद पवार यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या