पी चिदंबरम म्हणतात २ जी घोटळा झालाच नाही; तर भाजपने देशाची माफी मागावी – सिब्बल

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस सरकारवर काळा डाग म्हणून समजल्या जाणाऱ्या 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा आरोप असणारे ए राजा आणि कनिमोळीसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यानंतर आता 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा कधी झालाच नसल्याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी दिली आहे. तसेच युपीए सरकारमधील अधिकारी आणि मंत्र्यांना यामध्ये विनाकारण गुंतवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

तर भाजपने देशाची माफी मागावी अशी मागणी कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. ‘यूपीए २’ च्या कार्यकाळात टू जी स्पेक्ट्रम घोटाळा उघड झाला होता. त्यामुळे कॉंग्रेसला आपली सत्ता देखील गमवावी लागली होती. या घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीचे सुमारे १.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते, असा निष्कर्ष ‘कॅग’ च्या अहवालामध्ये काढण्यात आला होता.

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह कॉंग्रसच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला होता. पण आज कोर्टाने दिलेल्या निकालामुळे कॉंग्रसला मोठा दिलासा मिळाला आहे.दरम्यान या निकालाविरूद्ध सीबीआय आता हायकोर्टात जाणार आहे.