काँग्रेस-राष्ट्रवादी आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार: प्रफुल्ल पटेल

गोंदिया: आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. याबाबत दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीत आघाडी करण्याची चर्चा झाली असल्याची माहिती पटेल यांनी दिली.

भंडारा – गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ही जागा आपणच लढवणार असल्याचं जाहीर केलं. मात्र ही जागा राष्ट्रवादीला सोडायची की नाही, याबाबतचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी घेतील, असं काँग्रेसच्या नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल ? 

“सध्या भंडारा-गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे. काही वेळापूर्वी दिल्लीत राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीत याबाबतचा निर्णय झाला. केवळ हीच निवडणूक नव्हे तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढावं, अशी चर्चा झाली, गेल्यावेळी भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादीने तर पालघरची जागा काँग्रेसने लढवली, त्या जागा तशाच राहतील, असा निर्णय दोन्ही पक्षाचा झाला आहे”