Jayant Patil | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाची सद्यपरिस्थिती काय आहे याचा आढावा मांडला. तसेच त्यांनी भाजपवर टीका देखील केली. राज्यातील सर्व यंत्रणा विरोधकांना झुकविण्यासाठी वापरात आणली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील काळात पाच वर्षे विरोधात काढली. त्यानंतर झालेल्या २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ५४ आमदार निवडून आणले. आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने, कल्पकतेने, दूरदृष्टीने राज्यात नवे सरकार स्थापन झाले. भाजपला पवार साहेबांनी पुन्हा आव्हान दिले. हे आव्हान दिल्लीतील लोकांना रूचले नाही व पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार कमकुवत करण्याचा प्रयत्न सर्व मार्गांनी झाला.”
महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार
“देशात कुठेच भाजपचा अश्वमेध कोणी थांबवत नव्हते. मात्र महाराष्ट्रात पवार साहेबांनी हा अश्वमेध रोखला. पवार साहेबांनी अशक्य ते शक्य करुन दाखवत राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन केले. या कृतीतून महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही, हा विश्वास त्यांनी निर्माण केला,” असे जयंत पाटील म्हणाले.
२०२४ हे वर्ष आपलंच असेल
“राज्यातील सर्व यंत्रणा विरोधकांना झुकविण्यासाठी वापरात आणली जात आहे. त्यामुळे आता केवळ न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास राहिला आहे. पुढील काळात पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे यावा यासाठी लोकांच्या मनाला गवसणी घालायला हवी. विरोधात राहूनही सत्ताधारी जे करू शकत नाहीत ते राष्ट्रवादी करून दाखवत आहे, असं सामान्य गोरगरीब माणसाला वाटलं पाहिजे. यासाठी रस्त्यावर येऊन लोकांचे प्रश्न मांडण्याची तयारी आपण ठेवायला हवी. आपण प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करायला हवे. प्रत्येक समाजाला सोबत घेऊन पुढे जायला हवे. हे सगळं केलं तर २०२४ हे वर्ष आपलंच असेल”, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<