fbpx

तेलगीच्या शेकडो कोटी रुपयांच्या मालमत्ता सरकारजमा करा;तेलगीच्या पत्नीची इच्छा

पुणे : बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगीची पत्नी शाहिदाने तिच्या ताब्यात असलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या नऊ मालमत्ता सरकारजमा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसा अर्जही शाहिदाने वकिलांमार्फत पुणे सत्र न्यायालयात दाखल केला आहे.तेलगीच्या मालमत्ता खातरजमा करून सरकारजमा कराव्यात, तसेच या प्रकरणाचा फेरतपास करण्याची मागणीही शाहिदाने विशेष न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली आहे.

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट मुद्रांक घोटाळय़ाचा सूत्रधार अब्दुल करीम लाडसाब तेलगी याचा महिन्याभरापूर्वी बंगळुरूतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुद्रांक घोटाळय़ात उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय नेते, पोलीस अधिकारी यांना आरोपी करून अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील काही आरोपींनी अद्याप गुन्हा कबूल केला नाही. त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाचा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) तपास करण्यात आला होता. तेलगीची पत्नी शाहिदा हिलादेखील आरोपी करण्यात आले होते. न्यायालयाकडून तिची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.