अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस क्रांती दिनी करणार ‘कामबंद आंदोलन’!

औरंगाबाद : अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये कार्यरत सफाई कामगारांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्व कर्मचारी काम बंद आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. त्यासाठी सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. ९ ऑगस्ट रोजी सफाई कामगार हे काम बंद आंदोलन करणार आहेत. आपल्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचे सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.

राज्यात मनपा, नगरपंचायत, नगरपालिकेमध्ये सुरू असलेली ठेका पद्धत बंद करण्यात यावी. सफाई कामगारांची पदे मंजूर करावी, नवीन आकृतिबंध मंजूर करावा. सफाई कामगारांच्या वेतनावर शंभर टक्के अनुदान शासनाने मंजूर करावे. वर्ग ड महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती न करता कॅडरमधून आयुक्तांची नियुक्ती व्हावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनांची काटेकोर अंमलबजावणी होऊन प्रत्येक सफाई कर्मचारी घरे बांधून द्यावी.

सफाई कामगारांचे भाग्यविधाता कर्मवीर दादासाहेब वासुदेवरावजी चांगरे यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करावी. कर्मचारी आयोगाचे पुनर्गठन करून सफाई कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या कामगार पुढाऱ्यांची नियुक्ती करावी. यापूर्वी कोर्टाने नियुक्त केलेल्या सफाई कामगारांची लाड पागे समितीच्या शिफारशीचा लाभ मिळावा. अनुसूचित जाती करता राखीव असलेल्या १३ टक्के आरक्षण वाल्मीक समाजाकरिता वेगळे मिळावे. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटने करता मंत्रालयासमोर जागा मिळावी.

राज्य सफाई कामगारांचा स्वतंत्र संवर्ग तयार करण्यात यावा. सफाई कामगारांचा नियुक्तीसाठी मापदंड समिती निर्माण करावी. व त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. वारसदारांना नोकरी देताना लहान कुटुंबाची अट शिथिल करावी. इत्यादी मागण्या सफाई कामगारांच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विजेंद्र टाक, जिल्हा अध्यक्ष राकेश बीडलॉन यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या