महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देश हिंदवी स्वराज्य करण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र यावे

राजकारण्यांनी फक्त भगवा झेंडा घेऊनच राजकारण करावे

वाई : राजकारण्यांनी फक्त भगवा झेंडा घेऊनच राजकारण करावे. महाराष्ट्र राज्यच नव्हे, तर संपूर्ण देश हिंदवी स्वराज्य करण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. सध्या फक्त शिवसेनाच भगव्या झेंडय़ाखाली उभी असून इतर पक्षाच्या झेंड्यात इस्लामी पाचर मारलेले आहे. प्रतापगड ते रायरेश्वर या गडकोट मोहिमेच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

काय म्हणाले संभाजी भिडे ?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासननिर्मितीसाठी केंद्र व राज्यातील मंत्री, नेते मदत करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, महाराजांच्या सिंहासनासाठी बरबटलेल्या हातांकडून कुठलीही मदत स्वीकारणार नाही. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या ३२ मण सुवर्णसिंहासनासाठी आपण प्रयत्नशील आहोत. संबंधितांनी भगवे राज्य केल्यास त्यांच्याकडून सर्व प्रकारची मदत स्वीकारू. ‘मराठय़ांनी दिल्ली काबीज करून १४ वर्षे शासन केले. तीच परिस्थिती पुन्हा निर्माण करायची आहे. यासाठी आजपासूनच सर्वांनी कामाला लागले पाहिजे. राज्यातील प्रत्येक गावात युवकांनी छत्रपती संभाजी महाराजांची आठवण म्हणून ‘बलिदान मास’करण्यासाठी जनजागृती करावी.