सेवा संस्थांचे सर्व अर्ज बाद, बीड डीसीसीचे होणार काय? जाणून घ्या…

बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागल्यानंतर १९ जागांसाठी तब्बल १६० जणांनी २१४ उमेदवारी अर्ज दाखल केले. या संस्थेच्या सेवा संस्था मतदारसंघातून तब्बल ८७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सर्वच पक्षांच्या अनेक मातब्बरांचा समावेश आहे. आज उमेदवारी अर्ज छाननी सुरू झाली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली.

सेवा संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्यासाठी संबंधित संस्था अ किंवा ब वर्गातीलच असायला हवी हा नियम आहे. या नियमामुळे सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्वचे सर्व ८७ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठा पेच निर्माण झाला आहे. इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद झाले आहेत. ७३५ सेवा संस्थांपैकी अवघ्या १३ संस्थांचे लेखा परिक्षण अ किंवा ब वर्गात असल्याचे सांगण्यात येते.

निवडणूक स्थगित होणार का?
अ, ब दर्जाअभावी सेवा संस्था गटातील ८७ अर्ज बाद झाल्यामुळे नियोजित निवडणूक होणार की नाही यावर चर्चा होत आहे. काही तज्ज्ञांच्या मते एक तर सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेवर स्गगिती येऊ शकते. किंवा पुन्हा प्रशासक बसवून नंतर निवडणुकीची घोषणा होईल.

सहकार निवडणूक लवाद प्राधिकरणाच्या निर्णयाकडे लक्ष
एकूण १९ जागांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होत आहे. मात्र, सेवा संस्था गटातील अकरा जागांसाठीचे अर्ज बाद झाल्यामुळे अन्य आठ जागांसाठी निवडणूक होणार का? हे सध्या अनिश्चित आहे. जर निवडणूक झाली तरी आठ जागांतून अध्यक्ष निवड करता येणार आहे का? अशा एक ना अनेक तांत्रिक बाजूंनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला घेरून ठेवले आहे. राज्याचे सहकार निवडणूक लवाद प्राधिकरण काय निर्णय घेईल यावर बँकेचे भवितव्य ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या