मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरण : स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

ठोस पुरावे सादर करण्यात एनआयए अपयशी

टीम महाराष्ट्र देशा- हैदराबादमध्ये झालेल्या मक्का बॉम्बस्फोट प्रकरणी 11 वर्षांनंतर आज अखेर फैसला सुनावण्यात आला आहे. 2007 साली झालेल्या या बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठोस पुरावे सादर करण्यात एनआयए अपयशी ठरल्याने पुराव्या अभावी यात दोषी असलेल्या पाचही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

18 मे, 2007 रोजी शुक्रवारी नमाजावेळी हैदराबादच्या मक्का मशिदेत एक स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला तर 58 जण जखमी झाले होते. या प्रकरणात स्वामी असीमानंद हे मुख्य आरोपी होते. या घटनेचा तपास केल्यानंतर 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये अभिनव भारतच्या सर्व सदस्यांचा समावेश होता. या प्रकरणात स्वामी असीमानंद, देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा उर्फ अजय तिवारी, लक्ष्मण दास महाराज, मोहनलाल रतेश्वर आणि राजेंद्र चौधरी यांना आरोपी घोषित करण्यात आले होते.

या प्रकरणातले 2 आरोपी रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे हे अद्याप फरार आहेत. या प्रकरणी प्रमुख आरोपी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुनील जोशी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी हवाई मार्गे फायरिंगही केली होती. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत एकूण 160 साक्षीदारांची नोंद नोंदवण्यात आली होती.