Lohgad treak: लोहगड ट्रेक

lohgad treak photo

रविवारी सकाळी आम्ही ‘360 explorer’ सोबत ६० ते ६५ जणांना घेऊन सकाळी ५.४५ च्या लोकलने लोहगड ट्रेकसाठी निघालो . सकाळी सातला बरोबर मळवली येथे पोहचलो. पाच मिनिटांत आम्ही तेथून ट्रेकसाठी निघालो पुढे दोन किमी चालून झाल्यावर आम्ही  नाष्टा , चहा घेतला व ट्रेकसाठी इथून खरी सुरूवात आम्ही केली . तब्बल सहा किलोमीटर चालायच  होत आम्हाला. वरुणराजा सतत बरसत होता आणि समोर उंचावर लोहगडाचा विंचू कडा खरतर खालूनच आम्हाला खुणावत होता . दोन तासांच्या ट्रेकींग नंतर आम्ही लोहगडाच्या पायथ्याशी पोहचलो.

how to treak lohgad

गडाकडे चालत असताना तिथले धबधबे आणि सौंदर्य मी फक्त डोळ्यात साठवून ठेवत होतो. पुण्यावरून निघाल्यापासूनच हिरव्यागार डोंगरांचं दर्शन सोबत वाहणारे छोटे झरे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी मधेच दिसणाऱ्या दऱ्या आणि त्यांना पटकन झाकणारे धुके. हे अनुभव शब्दांत सांगता येत नाहीत. ते स्वतःच अनुभवावे लागतात. खरतर ट्रेकींग हा असा अनुभव आहे की यामुळे आपण आपल्या शारिरिक आणि मानसिक क्षमतांना, निसर्गाशी असलेल्या नात्याला, आपल्या कुवतीला, आपल्या सौंदर्यदृष्टीला , समयसुचकतेला आणि अनुशासनाला ओळखायची क्षमता देऊन जातो.

how to treak lohgad

प्रवास करत असताना जेव्हा आपण एखाद पर्वतशीखर पाहतो तेव्हा त्याची ऊंची पाहून एकतर आपली छाती भीतीने दडपून जाते , नजर खाली झूकते किंव्हा ते आपल्याला त्याला भेटण्यासाठी खुणावू लागतं. गड चढताना असणारा सुरुवातीचा उत्साह, कधी रिमझिम पाऊस यातून एक वेगळी प्रसन्नता असते. त्यात फोटोमध्ये ह्या निसर्गाला बंधिस्त करण्याची हौस असतेच, पण सोबत घेतलेलं सामानाचं ओझंही असतंच. जरा थोडं पुढे गेल्यावर जरा दमायला झालेलं असतं, चढही वाढायला लागलेला असतो. जसे वर चढू तसे काही लोकं विखुरले जातात.

how to treak lohgad

आपला स्टँमीना कसा टीकवावा, साधनांचा वापर काटेकोरपणे कसा करावा, निसर्गाच सौंदर्य कस टिकवाव याच मार्गदर्शन गाईड करत असतात आणि आपण काहीतरी वेगळ अनुभवतो आहोत याची जाणीव होते. डिस्कव्हरी वरचा ‘बीअर ग्रील’ आपल्यामध्ये संचारतो. आपण चालत राहतो. हळूहळू सहकाऱ्यांशी  संवाद कमी होऊन निसर्गाशी संवाद सुरू होतो. त्याचे श्वास कानी पडू लागतात. तो आपल्याशी बोलू लागतो, आपल्या चुका तो दाखवायला लागतो, त्याला काय हवय का नको हे तो सांगायला लागतो. मग आपल्याला आपल्या कृत्याची लाज वाटू लागते आणि कर्तव्याची जाणीव ही होते. तीथले लहान मोठे प्राणी आपल्याला सहकार आणि अनुशासन शिकवतात . वाऱ्याची झुळूक एसी पेक्षाही गार वाटू लागते.

how to treak lohgad

एखाद्या अवघड ठिकाणी, आपण किती उंचावर आलोय हे जाणवायला लागतं. कुठल्या निमुळत्या रस्त्यावरून, घसरट पायवाटेवरून पुढे जायला भीती वाटायला लागते. एकमेकांना हात देत तो अवघड रस्ता पार केला जातो. खाचखळग्यातून वर जाताना, दोन्ही हात आधाराला लावलेले असताना, कधी वरून पडणाऱ्या पावसात चेहरा पूर्ण ओला होऊन जातो. गडाचा दरवाजा दिसायला लागला की आपणच गड सर केल्यासारखा ऊर भरून येतो. पायऱ्या चढत किल्ल्याच्या माचीवर, झेंडा लावलेल्या टोकावर पोचलो की बरेचदा एक पठार दिसतं. एखाद्या कोपऱ्यातल्या विहिरीचे अवशेष असतात, त्यात पावसानं पाणी साठलेलंच असतं. एखादं छोटं मंदिर असतं. बाकी लोक नको म्हणत असताना आपण थोडे पुढे जाऊन काहीतरी विशेष काम करण्याच्या प्रयत्नही केलेला असतो. फोटो काढून काहीतरी मिळवल्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो, पण आपला प्रवास संपला तरी पुढे काहीतरी असावं असं वाटत राहतं. कदाचित शिवाजी महाराजांच्या वाचलेल्या अनेक गोष्टींमधून आपल्यालाही काहीतरी गवसेल अशी अजूनही अपेक्षा असते.

how to treak lohgad

धुक्याच्या पार कुठेतरी दूर एखादं हिरवंगार गाव दिसतं. पाण्याने भरलेले वाफे दिसतात, भाताच्या शेतीच्या रांगा दिसतात, दूरवर सहयाद्रीच्या रांगा दिसतंच राहतात. मान कुठेही फिरवा, उंच त्या डोंगरांकडे पाहून मन आणि छाती भरून येते. त्या डोंगरावर कधी झरे दिसतात, तर कधी ढगांचे लोट. एखादं मंदिरही दिसत राहतं. हे सर्व पाहताना, आपल्या गडावर, किल्ल्यावर आलेलं धुकं गालाला, हातांना लागून ते मऊ, ओलसर होतात. तीथून खाली पाहील की जाणवत आपण किती ऊंचीवर आलोय. वर चढत असताना मर्यादेत वागणारा वारा वर पोहोचल्यावर मात्र आपल्याला झोडपून काढतो.  एरवी खूप ऊंचावरून  ऊडणारे पक्षी जवळून जावू लागतात. त्या पर्वताने जतन करून ठेवलेली जैवविविधतेची संपत्ती पाहिल्यावर आपल्यामध्ये एक दिवसाच वृक्षरोपण करून जो काही महान कार्य केल्याचा अहंकार असतो , तो चक्काचूर होतो. काही वेळेसाठी तरी आपण अंतर्मूख होतो आणि डोळे मीटून तीथल असण मनात साठवत राहतो.

how to treak lohgad

खरी मजा तर उतरताना असते. सकाळी धावत चढणारे तेच लोक आता हळूहळू पाय टाकायला लागतात. मोठ मोठ्या पायऱ्यांवरून उतरताना गुडघ्यांची वाट लागते. कधी घसरट दगडांवरून एखादा घसरतोही. कधी ज्या दगडाला आधारासाठी हात लावतो तोच निखळून येतो. सकाळी स्वच्छ असलेले पायातले शूज लालसर मातीने आणि पावसाने एकदम ओळखू ही येणार नाही इतके बदललेले असतात. यात सोबत असणारे, सकाळी अनोळखी असलेले लोकही एकदम ओळखीचे होऊन जातात, एखादा एकदम जवळचा मित्रही होऊन जातो. परतीच्या रस्त्यावरही उत्साह तसाच टिकून असेल तर मात्र मानलंच पाहिजे.

how to treak lohgad

घर आलं की सकाळपासून संध्याकाळ पर्यंत आपण एका वेगळ्याच जगात होतो याची प्रचिती येते. ते आवाज, धूर, धूळ आणि गर्दी यांचा सहवास नकोसा वाटतो. डोळे बंद केल्यावरही तेच रम्य दृश्य डोळ्यासमोर दिसत राहतं. कधी झोपेत चुकून दरीत कोसळल्याचा भासही होतो. सकाळी उठल्यावर दुखणाऱ्या पायांनी मात्र जमिनीवर आणलेलं असतं आणि आपण पुन्हा एकदा सहयाद्रीच्या त्या आठवणीवर पुढच्या ट्रेकची वाट बघत बसतो.

खरंतर स्वतःला जिवंत ठेवायच असेल तर महिन्यातून एकदि ट्रेकींग हवच.

लेखक

प्रवीण डोके ( 360 explorer )