Alibaba- अलीबाबाचा स्मार्ट स्पीकर

अलीबाबाने ‘टिमॉल जिनी’ या नावाने स्मार्ट स्पीकर लाँच केला असून या माध्यमातून गुगल, अ‍ॅपल आणि अमेझॉनला आव्हान उभे केले आहे.

‘टिमॉल जिनी’च्या माध्यमातून अलीबाबा कंपनीने आर्टीफिशियल इंटिलेजियन्स क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे.  हा स्पीकर चिनी भाषेतील आज्ञावलीवर कार्य करणार असला तरी लवकरच याला इंग्रजीसह अन्य भाषांचा सपोर्ट प्रदान करण्यात येईल.  ‘टिमॉल जिनी’ असे म्हणून या स्पीकरला विविध कामे सांगू शकतो. हा स्पीकर हवामानाबाबतची माहिती, आवडीचे गाणे लावणे, ई-मेल चेक करणे आदी कामांसह वाय-फायच्या मदतीने घरातील सर्व स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करून त्यांच्या विविध फंक्शन्सला कार्यान्वित करू शकतो. यात ई-कॉमर्स साईटवरून विविध उत्पादनांची खरेदीदेखील शक्य आहे.

अमेझॉनचा इको, गुगलचा गुगल होम आणि अ‍ॅपलचा होमपॉड या स्मार्ट स्पीकर्समध्ये स्पर्धा आहे. यात आता अलीबाबाच्या ‘टिमॉल जिनी’चा समावेश होणार आहे. अन्य कंपन्यांचे स्मार्ट स्पीकर हे १०० ते १२० डॉलर्सच्या दरम्यान मिळत असतांना अलीबाबाचा स्पीकर हा फक्त ७३ डॉलर्सला मिळणार आहे.