निष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात

balasaheb

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकी आधी मेगाभरतीचा अनुभव घेतल्यानंतर भाजपला आता मेगागळतीचा अनुभवही घेता येणार आहे. कारण कॉंगेस – राष्ट्रवादीमधून पक्षांतर करून आलेले आमदार आता पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सत्तापालट होताचं भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.

भाजपमध्ये दाखल झालेले आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले सुमारे डझनभर आमदार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटातून करण्यात आला आहे. पक्ष बदलण्याचे टायमिंग चुकलेल्या या आमदारांची राजीनामे देण्याची तयारी असून ते तिन्ही पक्षनेत्यांच्या संमतीची प्रतीक्षा करीत असल्याचे समजते. भाजपच्या या आमदारांमध्ये मराठवाड्यातील ३, पश्चिम महाराष्ट्रातील पाच आमदारांचा समावेश असून आणखी चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे.

मात्र, काँग्रेस नेत्यांच्या घरवापसीसंदर्भात भाष्य केले. पक्ष सोडून गेलेले नेते आता अत्यंत अस्वस्थ आहे. आपण चुकीच्या वेळी भाजपमध्ये गेलो, आपण फसलो, अशी भावना त्यांच्या मनात आहे. मात्र, यापैकी काही नेते वारे फिरेल तसे फिरणारे आहेत. त्यामुळे या नेत्यांना पक्षात घेण्याची घाई करणार नाही. पक्षाला सोडून गेल्यानंतर अनेक जागी निष्ठावान कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. त्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय गयारामांना पुन्हा प्रवेश देणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी कालच भाजपला यासंदर्भात इशाराही दिला होता. समुद्राला जितकी मोठी भरती येते तेवढीच मोठी ओहोटीही येते. हा निसर्गाचा नियम आहे. भाजपमध्ये या ओहोटीची सुरुवात झाली आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते. मात्र, भाजप आमदार आशिष शेलार यांनी दावा फेटाळून लावला होता. भाजपमध्ये आधीपासून असलेले किंवा नव्याने आलेले आमदार पक्षाची शिस्त पाळणारे आहेत.

त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. महाविकासआघाडीने आपल्या आमदारांना मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र, आता प्रत्यक्षात काहीच घडत नाही. ही परिस्थिती पाहून आमच्याकडे आलेले आमदार ‘बरे झाले आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला’, असे म्हणत असल्याचा दावा शेलार यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या