दहावर्षीय आदिवासी चिमुकलीवर बलात्कार

akola rape case child

दहा वर्षांच्या आदिवासी चिमुकली बलात्कार

सचिन मुर्तडकर/ प्रतिनिधी
अकोला: तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरव्हा या आदिवासी वस्तीतील दहा वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे .स्थानिकांनी बलात्कार करणाऱ्या आरोपीला पकडून  पोलिसांच्या ताब्यात दिले आहे . मात्र  जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्याला सर्वोपचार रुग्णालयात जावून सदर पीडित मुलीची विचारपूस करण्यासाठी वेळ न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

खंडाळा या आकोट हिवरखेड रोडवर असलेल्या गावाच्या उत्तरेला बोरव्हा हे आदिवासी गाव असून, या गावातील दहा वर्षांची ही आदिवासी मुलगी रस्त्याच्या कडेला आपल्या घरच्या म्हशीला गवत चारत असताना खंडाळा रस्त्याने मोटारसायकलवर आलेल्या इसमाने तिच्या जवळ वाहन उभे करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीने विरोध केला असता त्या नराधमाने तिला मारहाण करून कुकर्म केले आणि पळून गेला. दरम्यान, मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून रस्त्याने जाणाऱ्या काहीजणांनी तिची विचारपूस केली असता मुलीने घडलेला प्रकार त्यांना सांगितला.

घटनेची माहिती मिळताच मुलीचे वडील व इतर नातेवाईकांनी लगेच हिवरखेड पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दाखल केली. दरम्यान, जि.प. सदस्य गोपाल कोल्हे आणि इतरांनी प्राप्त वर्णनावरुन परिसरात शोध घेवून या नराधमाला पोलिसांच्या हवाली केले. विलास नारायण तायडे (वय २७), रा. सेंबा, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा असे त्याचे नाव आहे. तायडे हा मूळचा मध्यप्रदेशातील असून, बुलडाणा जिल्ह्यात टेंबा येथे त्याची सासरवाडी आहे. त्याच्यावर यापूर्वीच चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हिवरखेड पोलिसांनी त्याच्या विरुद्ध भादंविच्या कलम ३२३,३७६ व पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मानवतेला काळीमा फासणारी ही घटना घडल्यावर सदर मुलीला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र जिल्हा प्रशासनाचा किंवा पोलिस प्रशासनाचा एकही वरिष्ठ अधिकारी तिला भेटून विचारपूस करण्यास आला नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे चोऱ्या आणि घरफोड्यांचे सत्र सुरु असतानाच आता दिवसाढवळ्या अशाप्रकारे लहान मुलीवर बलात्कार झाल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे .

या पीडित मुलीवर गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. कुकर्म केल्यावर गळा दाबून तिला जीवे मारण्याचाही त्या नराधमाने प्रयत्न केल्याचे मुलीच्या गळ्यावरील खुणांमुळे सिद्ध होते. दरम्यान, गुरुवारी या मुलीवर सर्वोपचारमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलीवर उपचार सुरु आहेत .