अजोय मेहता यांनी ‘त्या’ राजकीय नेत्याचे नाव जाहीर करावे – संजय निरुपम

मुंबई –  काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी असे वक्तव्य केले की कमला मिल प्रकरणामध्ये एका राजकीय नेत्याने फोन करून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ५ मनपा अधिकाऱ्यांचे निलंबन का केले ? असे देखील मला त्या नेत्याकडून विचारण्यात आले. तोच नेता १७ रेस्टोरंटमध्ये भागीदारसुद्धा आहे.

अजोय मेहता यांच्या या वक्तव्यावर आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम पत्रकार परिषदेत म्हणाले की, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ‘त्या’ राजकीय नेत्यांचे नाव जाहीर करावे. कोणत्या नेत्याने तुमच्यावर राजकीय दबाव टाकला हे त्यांनी उघडपणे जाहीर करावे, असे मी त्यांना आवाहन करत आहे. कोण हा राजकीय नेता आहे हे जनतेला कळाले पाहिजे.

माझे असे म्हणणे आहे की अजोय मेहता यांनी हे वक्तव्य जनतेची दिशाभूल करण्यासाठीच केलेले आहे. कमला मिल आग प्रकरणापासून सगळ्यांचे लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी केले आहे. पण आम्ही मात्र हे प्रकरण लावून धरणार आहोत, असेही ते म्हणाले.