अजित पवार यांनी केला खा.विजयसिंह मोहिते पाटलांबाबत मोठा गौप्यस्फोट

पुणे : एकीकडे रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करत असतानाच धवलसिंह यांनी मुंबईत पवारांची भेट घेतली. त्यामुळे आता माढा मतदारसंघात पुन्हा एकदा भाऊबंदकीचा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, माढ्यातून राष्ट्रवादीचे तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं.

माढा लोकसभा मतदारसंघात जनतेच्या आग्रहाने लढायला सांगितले म्हणून साहेब तयार झाले. नंतर साहेबांनी माघार घेत विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली, मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांनी वेगळेचं नाव दिले. त्यांनी दिलेल्या नावाला स्थानिक नेत्यांचा विरोध होता. बऱ्याच लोकांना वाटत होतं की दादांना उमेदवारी हवी होती. आम्ही दिली पण त्यांनी माघार घेतली याचा मी साक्षीदार आहे असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी पुण्यात केला .

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पक्षाने राज्यात नवीन चेहऱ्याना संधी दिली आहे. माढ्यामध्ये नवीन उमेदवार देणार असून २३ मार्चला याची घोषणा होईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.