fbpx

लोकसभेच्या उमेदवारीबाबत अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट  

टीम महाराष्ट्र देशा :  राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा आज साताऱ्यात दाखल झाली. या निमित्ताने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही असं सांगत विधिमंडळ पक्षनेते अजित पवार  यांनी लोकसभेच्या उमेदवारीबाबत मोठं भाष्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे त्यामुळे अजून उमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असे अजित पवार  यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पंचायत समितीचे काही सदस्य आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांना काही अधिकारच ठेवलेला नाही. त्यांना फक्त लग्नपत्रिकेवर नाव टाकण्यासाठी ठेवले आहे. ते त्यांचे प्रश्न घेऊन मंत्र्यांकडे जातात, पण त्यांना कुणीही विचारत नाही, असे पवार म्हणाले.

दरम्यान, याच पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. मोदी सरकार १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडणार आहे. पण हे बजेट निवडणुकांसाठी असेल,त्यावर ठोस काहीच होणार नाही. लोकांना प्रलोभने दाखवले जातील, पण मोदींची बस चुकली आहे. मोदींचं आता काहीच होणार नाही. कारण शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, डॉक्टर, सामान्य नागरिक अशा प्रत्येक या घटकाची नाराजी सरकारने ओढावून घेतली आहे,” असे ते म्हणाले.

तर, काल जालन्यात झालेल्या भाजपाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र चोरांच्या हातात देऊ नका. पण भाजपाचे सरकार आल्यानंतर १६ मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर आला आहे. माझे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही त्या १६ मंत्र्यांची चौकशी करा… जर मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली, तर आम्ही तुम्हाला पारदर्शी समजू. नाही तर त्या पापांमध्ये तुमचाही सहभाग आहे, असे आम्ही समजू, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ठणकावले.