मराठवाड्यातील “या” प्रकल्पाचे अजित पवार करणार उद्घाटन

टीम महाराष्ट्र देशा :  कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे इथेनॉल उत्पादन आता दुप्पट होणार आहे. दरम्यान, विस्तारित क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. अंकुशनगरच्या कारखाना परिसरात माजी उपमुख्यमंत्री, आमदार अजित पवार यांच्या हस्ते 60 किलोलिटर्स प्रतिदिन (60 के.एल.पी.डी.) क्षमतेच्या या इथेनॉल प्रकल्पाचे मंगळवारी सकाळी दहा वाजता भूमिपूजन होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आमदार राजेश टोपे राहणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, माजी आमदार चंद्रकांत दानवे, बबलू चौधरी, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश टोपे यांची प्रमुख उपस्थिती राहील, असे कारखान्याच्या अध्यक्षा शारदाताई टोपे, उपाध्यक्ष उत्तमराव पवार, कार्यकारी संचालक दिलीप पाटील, व्यवस्थापकीय संचालक बी. टी. पावसे आदींनी कळविले आहे.

समर्थ साखर कारखान्यातर्फे साखर निर्मितीसोबतच विविध प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू आहेत. यात सहवीज, इथेनॉल, डिस्टिलरी, कंपोस्ट खत अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. आता इथेनॉल प्रकल्पाचाही यानिमित्त दुप्पट विस्तार होणार आहे. गतवर्षी ऑक्‍टोबरला सुरू झालेल्या आणि यावर्षी एप्रिलला संपलेल्या गळीत हंगाम काळात कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पामधून 45 लाख 92 हजार 635 बल्क लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन होऊन 50 लाख 3 हजार 235 बल्क लिटर्स इथेनॉलचे उत्पादन झाले. सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून 6 कोटी 52 लाख 44 हजार युनिट वीजनिर्मिती झाली असून 2 कोटी 12 लाख 75 हजार युनिट वीज कारखान्याने स्वतःसाठी वापरली, तर 4 कोटी 39 लाख 69 हजार युनिट वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस विक्री केली. कंपोस्ट खत प्रकल्पाकडे 12 हजार 33 टन कंपोस्ट खताचे उत्पादन झाले.

महत्वाच्या बातम्या 

Loading...