Ajit Pawar । मुश्रीफांच्या घरावरील छापेमारीनंतर अजित पवार संतापले; म्हणाले, “ठरवून काही पक्षांवर…”

Ajit Pawar । पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) धाड टाकली आहे. कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याची माहिती मिळत कागल येथील घराबाहेर मुश्रीफ यांच्या समर्थकांनी एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, “अशा प्रकारे सूडबुद्धीने कारवाई करणं चुकीचं आहे. फक्त ठरवून काही पक्षांवर अशी कारवाई केली जात आहे.” ठाकरे गटातील राजन साळवी, नितीन देशमुख, वैभव नाईक यांच्यावर राज्यसरकारच्या अंतर्गत येणाऱ्या तपास यंत्रणाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे याला राजकीय रंग आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाहक त्रास कोणाला होता कामा नाही. अनिल देशमुखांवर कारवाई झाली पण कोणतेही पुरावे मिळाले नाही. संजय राऊत यांच्यासोबत देखील असेच झाले. हे सर्व प्रकार देशाला आणि राज्याला परवडणारे नाहीत असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, यावर हसन मुश्रीफ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर माहिती घेऊन या प्रकरणावर मी बोलणार आहे, असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आपल्याच नव्हे तर इतर नातेवाईक आणि मुलीच्या घरावरही छापेमारी करण्यात आल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. तसेच विशिष्ट समुदायाच्या लोकांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणीच ईडीने ही धाड मारल्याची माहिती मिळत आहे. ईडीचे पथक सकाळी कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. सकाळपासून पथकाने मुश्रीफ यांच्या घराची तपासणी सुरु केली आहे. तसेच, घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :