fbpx

राज्यातील जनतेच्या समस्यांसाठीच हल्लाबोल: अजित पवार यांनी कापसाच्या शेतात जावून केली पाहणी

वर्धा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल पदयात्रे दरम्यान विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्यातील रत्नापूर गावातील शेतकऱ्याच्या कपाशीच्या शेताला भेट दिली. हल्लाबोल पदयात्रा आंदोलनाच्या चौथ्या दिवशी रत्नापूर गावातील शेतकरी साहेबराव बापूराव सावंकर यांच्या शेताला अजित पवार आणि त्यांच्यासमवेत माजी मंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली.

साहेबराव सावंकर या शेतकऱ्याने दोन महिने झाले कर्जमाफीचा अर्ज भरुन परंतु अदयाप कर्जमाफी झालेली नाही. बोंडअळीने सात एकरातील कपाशीचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. यावेळी अजित पवार यांनी त्या शेतकऱ्यांना धीर देत तुमच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून शेतकऱ्यांच्या आणि राज्यातील जनतेच्या समस्यांसाठीच हल्लाबोल पदयात्रा काढत असल्याचे सांगितले.

यावेळी या शेतकऱ्याने आणलेल्या बैलगाडीतून अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काही मिनिटे प्रवास केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत: बैलगाडी हाकली. त्यानंतर अजित पवार यांनी काही अंतर ट्रॅक्टरही चालवले.