‘राज्यात वैचारिक, सामाजिक, साहित्यिक क्रांती घडवण्याचं श्रेय लोकशाहीर अण्णाभाऊंनाच’

ajit pawar - annabhau

मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे. दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना साहित्यात स्थान, समाजात मान आणि व्यवहारात न्याय मिळवून देणारे अण्णाभाऊ थोर समाजसुधारक होते. लोककला, लोकसाहित्य, लोकजीवन, पुरोगामी, सुधारणावादी विचारांचे ते स्वतंत्र विद्यापीठ होते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी देशासाठी, समाजासाठी दिलेल्या योगदानामुळे ते सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महान साहित्यिक होते. मानवतावादी लेखक होते. दुर्बल, वंचित, पिडीत, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचं कष्टमय वास्तव त्यांनी साहित्यातून मांडलं. उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊंनी जीवनभर मानवतावादाचा, शोषणमुक्तीचा लढा लढला. देशाचा स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, गोवामुक्तीचा संग्राम, सामाजिक विषमतेविरुद्धची लढाई अशा अनेक संघर्षात आघाडीवर राहून भूमिका बजावली. राज्यात वैचारिक, सामाजिक, साहित्यिक क्रांती घडवण्याचं मोठं श्रेय लोकशाहीर अण्णाभाऊंना असल्याचं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

अण्णाभाऊंचे योगदान हे कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी – उद्धव ठाकरे

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी दिलेल्या संदेशात ते म्हणतात, हे वर्ष अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीचे आहे. यानिमित्ताने लोकशाहीर अण्णा भाऊंना मानाचा मुजरा. अण्णा भाऊ हे केवळ कलावंत नव्हते, तर त्यांनी लेखक, कवी, लोकशाहीर म्हणून समाजातल्या विषमतेवर बोट ठेवले, कष्टकऱ्यांच्या व्यथांना आवाज दिला.

आपल्या पोवाड्यातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम मना-मनात पोहचवला. आपल्या श्रेष्ठ साहित्यकृतीतून मराठी आणि महाराष्ट्राची वैशिष्ट्ये जगभरात पोहचवली. अण्णाभाऊंचे हे योगदान कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेच आहे. अशा महान साहित्यरत्न अण्णाभाऊंना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

हे शिवशाहीचे नाही तर मोघलाईचे सरकार, मनसेचे महविकास आघाडीला थेट आव्हान!