दीडशेच्या आकड्याचे काय झाले- अजित पवार

नागपूर : भाजप नेते गुजरातमध्ये 150 जागा जिंकू असा दावा करीत होते. त्या आकड्याचं काय झालं, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला. विधानभवन परिसरात गुजरात निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, गुजरातमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्याचे निश्चित झाले असून. भाजप शंभरी पार जाताना दिसत आहे. सुरुवातीला भाजपचे काही नेते म्हणत होते गुजरातमध्ये 150 जागांशिवाय बोलूच नका, पण सुरुवातीला जेव्हा निकाल आले, तेव्हा काही काळ काँग्रेसने आघाडी बनवली होती. तेव्हा सर्व जगाने पाहिले, आपली लोकशाही किती प्रगल्भ आहे. मी सांगेल ती पूर्वदिशा हे जनता कदापि सहन करत नाही. येणाऱ्या काळात देशात निश्चितच मोठा बदल जनता घडवेल.

या निकालाने विरोधी पक्षांना बळ मिळाले आहे काँग्रेस प्रमुख राहुल गांधी व त्यांच्या चमूने गुजरातमध्ये आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यामुळे गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी विरुध्द राहुल गांधी असेच राजकारण बघायला मिळाले. ज्या पध्दतीने राहुल गांधी आणि त्यांच्या चमूनी काम पाहिले त्यावर जनतेने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केल्याचे दिसते. भविष्यात समविचारी पक्षांनी एकत्र आल्यास एक वेगळेच चित्र देशापुढे येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.