भटक्या समाजाबाबतीत घडलेली घटना महाराष्ट्रात पुन्हा घडू नये; दोषींना कडक शासन करा – अजित पवार

ajit pawar

नागपूर  – महाराष्ट्र हे बारा बलुतेदारांचे राज्य आहे.परंतु सरकार भटक्यांसाठी काहीच करताना दिसत नाही. सरकारने भटक्या जमातीसाठी साधी बैठकही बोलावली नाही. मध्यंतरी राईनपाडा येथील भटक्या समाजातील लोकांना पोरं पळवणारी टोळी म्हणून जबर मारहाण करण्यात आली होती. जनावरांना मारताना आपण दहा वेळा विचार करतो पण त्या पाच जणांना बेदम मारहाण करत ठार करण्यात आले. यात जे कोण दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्रात पुन्हा असे घडणार नाही असे शासन त्यांना करावे अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली.

विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नियम २९३ वर बोलताना राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि सरकारच्या फसव्या योजनांचा उडालेला बोजवारा आणि पतंप्रधानांनी जीएसटी लावून लोकांची केलेली फसवणूक यावर दादांनी जोरदार फटकेबाजी केली.

आपल्या भाषणामध्ये अजितदादांनी सरकारच्या प्रत्येक योजनांचा खरपूस समाचार घेतला. त्यावर बोलताना भाजप आणि शिवसेनेला चिमटा काढत सरकार राबवत असलेल्या फसव्या योजना आणि खोटी आश्वासनांवर आक्रमक भूमिका घेत अजितदादांनी सभागृहात सरकारला घाम फोडला.

या सरकारमध्ये समाजातील कोणताही घटक आज समाधानी नाही. अच्छे दिन कुठे गेले तेच कळत नाही. सरकारमधील मंत्रीच म्हणत आहेत की, अच्छे दिन आमच्या गळ्यातील हाडूक बनले आहे. बहोत हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार असे म्हणत हे सरकार सत्तेवर आले. पण यांच्या काळात महागाई प्रचंड वाढली, घरगुती गॅसचे दर वाढले आहे, पेट्रोल महागले आहे म्हणून आता म्हणावे लागत आहे की पेट्रोल हुआ ८० पार अब जायेगी भाजप सरकार असा टोला अजित पवार यांनी लगावला.

सरकारतर्फे सामान्य लोकांना शॉक देण्याचे काम सुरू आहे. युपीए सरकार असताना एक देश एक कर अशी संकल्पना मांडली गेली होती. राज्यात एलबीटी आणला गेला होता. तेव्हा आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीला विरोध केला होता. आज सरकारने जीएसटी अमलात आणली आहे पण ती २८ टक्क्यापर्यंत नेली गेली आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले. आता वीजेचे दरही वाढतील . एशिया खंडात पेट्रोलचे सर्वात महाग दर महाराष्ट्रात आहेत. केंद्र सरकार यावर काहीच कसे करत नाही. सरकार यांचेच मग का निर्णय घेतले जात नाही असा संतप्त सवाल अजितदादांनी सरकारला केला.

पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो पहावाच लागतो. या देशाला अनेक दिग्गज पंतप्रधान लाभले आहे मात्र एवढी स्वत:ची जाहिरातबाजी कोणी केली नव्हती. ज्यांनी पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो लावला नाही त्यांना धमक्या देण्यात आल्या असेही दादा म्हणाले.

सध्या या महागाईचा फटका गरीबांच्या एसटीलाही बसला आहे. वीजेचे दरही वाढणार आहेत. सरकारने मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटीक महाराष्ट्र ही योजना आणली परंतु उद्योगपती इकडे यायलाच तयार नाही. महागाईमुळे हे घडत आहे. त्यांना वीज स्वस्त मिळत नसेल तर का येतील ते इथे. ते गुजरात आणि इतर राज्यात जाणार नाही का ? यामुळे गरीबांचा रोजगार जाईल मग काय फायदा तुमच्या मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटीक महाराष्ट्राचा ? असा सवालही अजितदादांनी केला.

राज्यातील मुलांना जन्म घेणे सध्या महाग झाले आहे. शाळा महाग, कॉलेज महाग, हॉस्पिटल महाग. जन्मल्या जन्मल्या त्यावर कर्जाचे ओझे आहे. जगणंही मुश्कील झाले आहे आणि मरणेही मुश्कील झाले आहे असा टोलाही दादांनी सरकारला लगावला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव कमी झाले मात्र देशातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले जात नाही. सामान्य जनतेकडून विविध कर आकारले जात आहे त्यामुळे महागाई वाढवण्यासाठी सरकार हातभार लावत आहे. सरकारतर्फे वेळोवेळी पेट्रोलवर सेस लावला गेला आहे. महाराष्ट्रात कराचे दर सर्वाधिक आहेत हेच का तुमचे अच्छे दिन ? असा संतप्त सवाल अजितदादांनी केला.

जीएसटी कमी करा अशी आमची मागणी आहे. २८ टक्के जीएसटी ही अती आहे. दुधावर आणि मर्सिडीजवर एक जीएसटी लावू शकत नाही. दुधावर कमी जीएसटी असायला हवा आणि मर्सिडीजवर जास्त जीएसटी लावावा अशी मागणी अजितदादांनी केली.

विदर्भात अधिवेशन होत आहे. मात्र याच काळात ते वाघ मेले. वाघ शिवसेनेचे चिन्ह आहे म्हणून तर ते वाघ मारले गेले नाही ना ? शिवसेनेची अजून सटकली नाही म्हणून बरे आहे नाही तर तुम्हाला बाराच्या भावात जावे लागले असते असा चिमटाही भाजपला अजित पवार यांनी काढला.

इज ऑफ डुईंग बिझनेसचे तीन तेरा झाले आहे. सरकारने सांगितले होते की आम्ही राज्याला टोलमुक्त करू मात्र अजूनही महाराष्ट्रात टोलमुक्ती झाली नाही. हा सगळा चुनावी जुमला होता असा आरोपही अजितदादांनी केला.

ठाण्यात मेट्रोची गरज असताना मात्र तिथे मेट्रो आणली जात नाही. नको तो प्रकल्प आणला जातो. बुलेट ट्रेन आणली जात आहे. आधी आहे ती रेल्वे नीट करा. कुणाच्या बालहट्टामुळे हे केले जात आहे तेच कळत नाही ? लोकांकडे अनेक पर्यायी व्यवस्था आहे मात्र सरकार का बुलेट ट्रेनला प्राधान्य देत आहे तेच कळत नाही अशी शंकाही अजितदादांनी व्यक्त केली.

आज शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासाची दुरवस्था आहे मात्र राज्यातील मंत्र्यांच्या निवासावर ४ ते ५ कोटी रुपये खर्च केले जात आहे. आज राज्यावर भरमसाठ कर्जाचा बोजा झाला आहे. आघाडी सरकारच्या काळात सरकारवर एवढे कर्ज नव्हते तरी आजचे सत्ताधारी म्हणत होते की सरकारने राज्याला दिवाळखोरीकडे ढकलले आहे.

त्यावेळी या सरकारचे शब्द काय होते ? खडसे रोज भांडत होते मात्र त्यांनाच आज साईड ट्रॅकला केले गेले. भांडले कोण आणि सत्तेत बसले कोण ? शिकार केली कुणी आणि आता ताव मारतंय कोण अशी परिस्थिती झाली आहे अशी टिकाही अजितदादांनी केली.

राज्यात पोलिस नावाची यंत्रणाच राहिली नाही; नागपूर आणि राज्यातील क्राईमवरुन दादांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

राज्यात आज पोलीस नावाची यंत्रणाच राहिलेली नाही. मुख्यमंत्री म्हणतात नागपूरला बदनाम करू नका. नागपुरात ११ दिवसात ९ हत्या घडल्या आहेत. ही राज्याची परिस्थिती झाली आहे.

गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र सर्व राज्यांना मागे टाकत आहे. अनेक ठिकाणी गाडया फोडल्या जात आहेत. एटीएम फोडले जात आहेत. दरोडे टाकले जात आहेत. यावर मुख्यमंत्री आधीच्या सरकारची आणि आताच्या सरकारची तुलना करतात. आम्ही चुकलो म्हणून तर लोकांनी तुम्हाला सत्तेत बसवले ना. लोकच नाही तर महाराष्ट्रातील पोलिसांवरही हल्ले होत आहे. पोलिसांचा दरारा कमी झाला आहे. आर.आर.आबांच्या काळात, भुजबळांचा काळात कधी असे घडले नाही. परंतु आज पोलिसांचीच हत्या केली जात आहे. अश्विनी बिंद्रे हे त्याचे उदाहरण आहे .खुन करण्यासाठी, लुटमार करण्यासाठी, कायदा सुव्यवस्था हातात घेण्यासाठी सत्तेत बसवले का? असा संतप्त सवाल करत अजितदादांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

यावेळी अजित दादांनी राज्यात घडत असलेल्या गुन्हेगारीचे आणि हत्यांची उदाहरणे देत आणि दलितांवरील वाढते अत्याचार, महिलांकडे शरीरसुखाची मागणी करणारे अधिकारी, भाजपमध्ये प्रवेश केला नाही म्हणून जळगावच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला आणि तिच्या पतीला खोटया गुन्हयात अडकवण्याचे प्रकार भाजप करत असल्याची माहिती सभागृहामध्ये देतानाच भाजप कसे हीन दर्जाचे राजकारण खेळत आहे याचे दाखले देत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.