अजित पवारांच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कर्जांच्या वितरणात हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याप्रकरणी पाच दिवसांच्या आत एफआयआर नोंदवून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने राजकीय पक्षांना झटका बसला आहे. त्यामुळे बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळांमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्यासह अनेक नेते अडचणीत आले आहेत.

या प्रकरणात बँकेतील संचालक मंडळाने तसेच कर्जमंजुरी समितीने अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या आणि संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्य व सवलतीच्या दरात कर्जांचे वितरण केले. अशा कर्जांची परतफेड न झाल्याने बँक डबघाईस आली आणि सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्याची शिखर सहकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएससी बँकेतील गैरव्यवहारांचा प्रश्न जवळपास दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणी जर खरच कारवाई झाली तर अजित पवार, आनंदराव अडसूळ, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.