‘चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं’; शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाने अजित पवार भावुक

shivshankar patil

मुंबई : शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनानं मानवसेवेला वाहून घेतलेले सेवेकरी निर्माण करणारं चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं आहे. एक व्रतस्थ सेवेकरी, निष्काम कर्मयोगी, अध्यात्माच्या माध्यमातून मानवसेवेचा डोंगर उभा करणारं महान व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. शेगाव संस्थानचा चेहरामोहरा बदलणाऱ्या शिवशंकर भाऊंचं व्यवस्थापनकौशल्य जगात सर्वोत्कृष्ट होतं. शेगाव संस्थानच्या माध्यमातून त्यांनी उभारलेली यंत्रणा, केलेलं काम जगभरातल्या युवकांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मयोगी शिवशंकर भाऊंच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी शेगाव संस्थानच्या कार्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर व्यवस्थापन कौशल्य, कल्पकतेच्या बळावर संस्थानचा चेहरामोहरा बदलला. मानवसेवेला वाहून घेतलेले सेवकरी निर्माण केले. शेगावच्या मंदिर परिसरात स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला. मंदिरातील दर्शनरांगेत, सोयी-सुविधांची भर घालत अमूलाग्र बदल केले. भाविकांना सहज, सुलभ, आनंददायी दर्शनाची सोय उपलब्ध करुन दिली. भाविकांसाठी आदर्शवत भक्तनिवासांची उभारणी केली. अत्यल्प किंमतीत महाप्रसादाची व्यवस्था केली.

भक्तांचा विश्वास, श्रध्देच्या बळावर शेगाव संस्थानच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. सेवेकरांच्या माध्यमातून भाविकांना संस्थानाशी जोडून गेतलं. मंदिराच्या उत्पन्नातून भाविकांना सेवा पुरविण्याबरोबरच सर्वोत्कृष्ठ अभियांत्रिकी महाविद्यालयाची उभारणी केली. आनंदसागरसारखी जागतिक किर्तीची बाग उभारुन अध्यात्मिक पर्यटनाला चालना दिली. कर्मयोगी शिवशंकर भाऊंच्या निधनाने मानवसेवेचा वसा घेतलेल्या सेवेकरी निर्माण करणारं चालते-बोलते विद्यापीठच हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

महत्त्वाच्या बातम्या