fbpx

सेना – भाजपच्या निष्ठावंत आमदारांना अजित पवारांनी दिली खास ऑफर

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत चांगलीच टोलेबाजी केली आहे. शिवसेना – भाजपचे आमदार निवडून येऊन काय फायदा. कारण मंत्रिपद तर बाहेरून आलेल्या आमदारांना दिले जाते. त्यामुळे सेना भाजप आमदारांनी आता कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करावा आणि राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आला की पुन्हा आपल्या पक्षात प्रवेश करावा म्हणजे मंत्रीपद मिळेल, अशा  शब्दात अजित पवारांनी सेना-भाजपला टोला लगावला आहे.

राज्यात फडणवीस सरकारच्या कार्यकाळातले शेवटचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि युती सरकारमध्ये जोरदार टोलेबाजी पाहिला मिळत आहे. विरोधक राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलेचं चिमटे काढत आहेत.
यावेळी अजित पवारांनी राधाकृष्ण विखेंवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, विखे आमच्या बाजूला होते तेव्हा मुंबईच्या डीपी घोटाळ्याबाबत आरोप केला होता. १ लाख कोटीचा घोटाळा डीपीमध्ये झाला असून त्यातून १० हजार कोटी रुपये मुख्यमंत्री कार्यालयाला मिळाल्याचा आरोप विखेंनी केला होता. आता विखे गृहनिर्माण खात्याचे मंत्री झाले आहेत त्यांनी आता त्यांच्या आरोपांवर खुलासा करावा आणि मुख्यमंत्र्यानीही याबाबत स्पष्टीकरण द्यावे.

दरम्यान जयदत्त क्षीरसागर आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला राम राम ठोकत शिवसेना भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच या प्रवेशा नंतर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी या दोन्ही आयात नेत्यांना युती सरकारने मंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे युती मधील निष्ठावंत मात्र वंचित राहिले. यावरूनचं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.