fbpx

रावेरच्या बदल्यात आम्ही पुणे मागितलेचं नव्हते; अजित पवार यांचे स्पष्टीकरण

ajit pawar

टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेस-राष्ट्रवादीने जागांची अदलाबदल केली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. त्यामुळे रावेरच्या बदल्यात आता कॉंग्रेस राष्ट्रवादीसाठी पुण्याची जागा सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. या चर्चेवर आता ष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पूर्ण विराम दिला आहे.

रावेर मतदारसंघ कॉंग्रेसला सोडल्याच्या बदल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने पर्यायी मतदारसंघ मागितलेला नाही. जातीयवादी शक्तींना हरवून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. आज पुण्यात एका बैठकीसाठी अजित पवार आले होते. त्या वेळी त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

पवार म्हणाले, “जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर हे दोन मतदारसंघ आहेत. कॉंग्रेसच्या तेथील कार्यकर्त्यांचे म्हणणे होते, की जिल्ह्यातील रावेरची जागा आम्हाला सोडली, तर आमच्या कार्यकर्त्यांनादेखील तेथे काम करण्याची संधी मिळेल. जागावाटपाच्या चर्चेच्या वेळेस आम्ही रावेरची जागा सोडण्याबाबत पर्यायी जागेची मागणी केली होती; परंतु या वेळेला भाजप- शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे मतांची विभागणी टाळण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. चांगले होणार असेल, तर त्यात टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता नाही.

दरम्यान, पुण्याच्या जागेबाबत अद्याप माझ्या स्तरावर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही स्पष्ट केले आहे.

1 Comment

Click here to post a comment