‘…तर मी पवारांची औलाद सांगायचो नाही’

blank

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत. या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचाही समावेश आहे. या यात्रेतील परळी येथील सभेत अजित पवार यांनी कर्जमाफी केली नाही तर पवारांची औलाद सांगायचो नाही असं विधान केले आहे.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी ‘तुम्ही म्हणाल अजित पवार, तुम्ही एवढं कडक सांगताय, काय तुम्ही करणार? आमचं सरकार सत्तेवर आलं, तर आम्ही त्यांच्यासारखी कर्जमाफी तुम्हाला करणार नाही. मी आपल्या सर्वांना सांगतो, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने सांगतो… परळीकरांनो, मी दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. पहिल्या चार ते सहा महिन्यांमध्ये तुम्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगायचो नाही’ असं विधान अजित पवारांनी केले.

तसेच पुढे बोलताना ‘आम्ही पहिल्यांदा करुन दाखवलंय, या लोकांची करुन दाखवण्याची दानत नाही. यांच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. माझ्या १६ हजार आया-बहिणी विधवा झाल्या. देवेंद्र फडणवीस साहेब, कोणावर ३०२ चा गुन्हा दाखल करायचा सांगा. काय केलं होतं त्या शेतकऱ्यांनी? का ही परिस्थिती निर्माण झाली? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

दरम्यान, याच सभेत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीकरांना भावनिक साद घातली. त्यांनी ‘ही निवडणूक माझ्या जीवन-मरणाची आहे, गेल्या 24 वर्षात केलेल्या सेवेचं फळ मला द्या असं विधान केले आहे.