ताई ‘आगे बढतीय’ तुम्ही फक्त तिच्या मागे उभे रहा, बहिणीसाठी अजित पवार मैदानात

पुणे: पवार कुटुंबियांचा गड असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी खा सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, यावेळी पुण्यातील नरपतगिरी चौकात सभा घेत कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आहे, सभा ठिकाणी कार्यकर्त्याकडून ‘सुप्रियाताई आगे बढो’च्या घोषणा देण्यात येत होत्या, यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताई ‘आगे बढतीय’ तुम्ही फक्त तिच्या मागे उभे रहा, असे आवाहन केले आहे.

बारामतीतून सुप्रिया सुळे आणि पुण्यातून मोहन जोशी यांनी आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहेत. यावेळी झालेल्या सभेत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.

आमच्या पक्षात काय चाललंय हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठरवतील, पंतप्रधान मोदी यांनी पवार कुटुंबियांची चिंता न करता समाजाची करावी, अशी टीका पवार यांनी केली आहे. मोदी यांनी विरोधकांवर टीका करण्यापेक्षा गरीबांना न्याय देण्याची भुमिका घेतली असती, राफेल विमान खरेदीची शंका डोक्यातून काढली असती बरं झालं असता, असा टोला देखील पवार यांनी लगावला आहे.

दरम्यान, भाजपचे नेते मोदींना कधी विष्णूचा अवतार म्हणतात, तर कधी हनुमानाची जात काढतात तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणतात, मोदींनी आधी याचे आत्मपरिक्षण करावे, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.