fbpx

मनसेला आघाडीत घेण्यावरून काका पुतणे आमने-सामने

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घ्यायचं कि नाही या मुद्द्यावरून काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार आमने-सामने आले आहेत. नुकतीच शरद पवार यांनी मनसेसोबत आघाडीची शक्यता फेटाळली होती.आज अजित पवार यांनी काकांच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका उघडपणे घेतल्याने काका-पुतण्यातला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

शरद पवार पंढरपूरमध्ये काय म्हणाले होते ?

राज ठाकरे यांना तरुणांचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असते. परंतु, निवडणूक समझोत्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा झालेली नाही आणि ती होईल असं दिसतही नाही.

नेमकं काय म्हणाले अजित पवार ?

‘प्रत्येक राजकीय पक्षाचा त्यांना मानणारा असा मतदार असतो. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांना लाख लाख दीड लाख मते घेतल्याचे तुम्ही पाहिले असेलच. मनसेबाबत आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी तसेच काँग्रेसने वेगवेगळी मते मांडली आहेत. मात्र असेल असले तरी आगामी निवडणुकीत मोदी सरकारविरोधातील मतविभाजन टाळणेगरजेचे आहे. हे मतविभाजन टाळण्यासाठी सेक्युलर विचार मान्य असलेल्या समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यासाठी मनसेने आघाडीसोबत यावे असे मला वाटते’

दरम्यान , काल राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’वर पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यामुळे राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीला स्वतंत्र रित्या सामोरे जात आहेत की काय अशी शक्यता वर्तवली जात होती. राज ठाकरे जर स्वतंत्र लढले तर मुंबई , पुणे , नाशिक या मुख्य शहरांमधून लोकसभा निवडणुकीस उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा आहे. पण अजित पवार यांनी काकांच्या विरुद्ध दिलेल्या वक्तव्यामुळे मनसेला महाघाडीत घेण्याची शक्यता आहे.