fbpx

‘मराठी अभिमान गीता’तील कडवं वगळल्याचा अजित पवारांचा आरोप

ajit-pavar devendra fadanvis

टीम महाराष्ट्र देशा- मराठी भाषा दिनानिमित्त विधीमंडळाच्या आवारात मराठी अभिमान गीताच्या समूहगायनावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे . समूह गायनादरम्यान माईक बंद पडल्याने सरकारची नाचक्की झाली. तर या गीतातील एक कडवे समूहगायनादरम्यान वगळण्यात आले, असा आरोप माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी  केला. सरकारने मराठी भाषा आणि सुरेश भट यांचा अवमान केल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी घोषणा दिल्या. शेवटी गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

काय आहे नेमकं प्रकरण ?
मराठी भाषा दिनानिमित्त विधानभवन परिसरात मराठी अभिमान गीताचे समूहगायन करण्यात आले. संगीतकार कौशल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली या समूहगीताचे गायन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सर्वपक्षीय आमदार याप्रसंगी उपस्थित होते.समूहगायन सुरु असताना माईक काही काळासाठी बंद पडला. विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी यावरुन सरकारवर टीका केली. या गाण्यातील एक कडवे वगळल्याचा आरोपही विरोधकांनी केला. ‘पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी..’ हे कडवं गाळल्याचा आरोप विरोधकांनी केला.

अजित पवार यांचे टीकास्त्र

विधिमंडळात आज मराठी भाषा दिन साजरा करताना मराठी अभिमान गीताचे शेवटचे कडवे वगळण्यात आले. गीताचे गायन सुरु असताना अचानक माईक बंद झाला. हे कोणी मुद्दाम करत आहे का? याचे कंत्राट कोणाला दिले होते? यातून कोणाचा फायदा होत आहे?, याची चौकशी झाली पाहिजे, राज्यातील काही मुलांना मराठी नीट वाचता येत नाही. सभागृहातील काही सदस्यांनाही मराठी नीट येत नाही. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शाळेत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा केला पाहिजे. हा निर्णय अत्यंत आवश्यक आहे. हा निर्णय घेतला, तरच भाषा टिकेल, अशी मागणी अजित पवारांनी केली.