आमदारांना पाच पाच कोटी देऊन पक्षात घेण्यासाठी भाजपकडे कुठून पैसे आले?’-अजित पवार

सांगलीत अजित पवारांची चोफेर फटकेबाजी

सांगली – ‘मनसेचे राज ठाकरे पाच पाच कोटी देऊन आपले नगरसेवक पळविल्याचे सांगत आहेत, तर खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांचे जावई आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजपकडून सुरू असलेला घोडेबाजार चव्हाट्यावर आणला आहे. आमदारांना पाच पाच कोटी देऊन पक्षात घेण्यासाठी भाजपकडे कुठून पैसे आले?’ असा थेट सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे केला.

पोलिस मारहाणीत मृत्यू पावलेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पवार सांगली येथे आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, ‘सरकारच्या वारेमाप घोषणा आणि कृतिशून्य कारभार सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील खड्डे पडलेत, आभाळ फाटेलेले नाही. निम्मे पैसे डांबराला आणि निम्मे पैसे मीडियाला मॅनेज करायला वापरण्याचा सल्ला देत असतील तर राज्याचे अवघड आहे. लाज नसलेले मंत्री कारखान्याची दारू खपत नसेल तर त्या दारुला महिलांचे नाव देण्याचे सल्ले भर सभेत देत आहेत. खुद्द मुख्यमंत्री नाभिक समाजाबाबत अपशब्द वापरत आहेत. हे त्यांना शोभत नाही. त्यांना जनता म्हणजे किडा-मुंगी वाटते काय? शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे सरकार जनतेच्या मागण्यांकडे पहिल्यांदा दुर्लक्ष करुन नंतर त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत बेजबाबदारपणे वागत आहे. सरकार प्रशासनावरची पकड घालवून बसले आहे. पोलिसाची पत्नीच दरोडेखोरांच्या टोळीची मुकादम असल्याचे उघड झाले आहे. सापडेल त्याला पोलिस मारत सुटले आहेत, अशा प्रकारे त्यांना कायदा हातात घेता येणार नाही, हे सकारने लक्षात घ्यावे.’