‘आमच्यावेळी आंदोलन करणाऱ्या समाजसेवकांची आता दातखिळी बसलीय का?’

ajit pawar

टीम महाराष्ट्र देशा : माहिती अधिकाराच्या मुद्यावरून राष्ट्रवादी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजसेवक आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. माहिती अधिकाराचा कायदा कडक करा म्हणून अनेक समाजसेवक ओरडत होते. आंदोलन करत होते आणि आज भाजपाने माहिती अधिकार कायदा संपवला असताना आमच्या वेळी आंदोलन करणारे समाजसेवक आता कुठे गेले? यांची दातखिळी बसलीय का? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.

जिंतूरच्या शिवस्वराज्य यात्रेच्या जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.यावेळी अजित पवार यांनी आंदोलन करणाऱ्या समाजसेवकांवर जोरदार टीका केली. तसेच ही सत्ता संपवली पाहिजे. महादेवासारखा तिसरा डोळा उघडून या सरकारला आपल्याला घालवण्याची गरज आहे. निवडणुका जवळ येत आहेत. ३७० चा मुद्दा इथे काढतील. तो मुद्दा जम्मू आणि काश्मीरचा आहे. त्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही भाजप सरकारला पाच वर्षांत काय केले हे विचारा, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.

तसेच या सरकारनं पोलीस भरती राबवली नाही. स्व. आर.आर. पाटील आणि आम्ही सर्वांनी मिळून दरवर्षी 13 हजार याप्रमाणे ५ वर्षांत ६५ हजार पोलिसांची भरती केली. तर दुसरीकडे गेल्या ५ वर्षांत माझ्या परभणीत, सेलू, जिंतूरमध्ये एकही कारखाना या सरकारनं आणला नाही. मग हाताला कामं कशी मिळणार? आता व्यवसाय होत नाही. माल खपत नाही. ऊस, कापूस, सोयाबीनला योग्य भाव नाही. शेतकऱ्यांचे कैवारी फक्त पवार साहेब होते. याची जाणीव शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे असं आवाहन अजित पवारांनी शेतकऱ्यांना केलं.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. तर खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा देखील काढली आहे. या यात्रेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजप सरकारला चांगलेचं धारेवर धरले आहे. तर जनतेमध्ये ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा’ हे बीज रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.