fbpx

विधानसभेलाही मोदींनी बारामतीत सभा घेतली, तरीही मी एक लाख मतांनी विजयी झालो – पवार

पुणे: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात विजय मिळवण्याचा संकल्प भाजपने केला आहे, दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना मैदानात उतरवत भाजपने सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले आहे. कुल यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बारामतीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. मोदींच्या सभेने बारामती जिंकण्याचा विश्वास भाजप नेते व्यक्त करत आहेत, मात्र मोदी यांनी २०१४ साली विधानसभा निवडणुकीवेळी देखील बारामतीमध्ये सभा घेतली होती, तरीही मी एक लाख मतांनी विजयी झालो होतो, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

शिरूर लोकसभेसाठी आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील, राज्य उपाध्यक्ष मंगलदास बांदल, शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे स्क्रीन लावून लोकांना खरी परीस्थिती सांगत आहेत, त्यामुळे त्यांच्या भाषणाची दखल सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागत आहे, मोदींनी देशातील महागाई कमी करू असे सांगितले होते पण तसं झालेले नाही , जीएसटी, नोटबंदी आणली. गरिबांकडे पैसे नाहीत, कॅशलेस व्यवहार सुरू होईल असे सांगितले होते. मात्र काहीही झालं नाहीम अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.