fbpx

कर्जमाफी दूरचं सरकार शेतकऱ्यांची लुटमार करतयंं : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत होते. त्यानंतर अनेक वाटाघाटी, रुसवेफुगवे दूर करत आज अखेर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. तर दुसरीकडे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी एकत्र येत धनंजय मुंडे यांच्या घरी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत पावसाळी अधिवेशनात कोणते मुद्दे अग्रणी असणार याचा आढावा देत युती सरकारच्या चुकांचा पाढा वाचला.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्याच्या कर्जपुरवठ्याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, पीक कर्ज घेतलेल्या राज्यातील शेतक-यांना जाहीर झालेली कर्जमाफी मिळणे तर दूरच उलट शेतकऱ्यांना १२ ते १३ टक्के दराने व्याज आकारून त्यांची लुटमार चालू आहे. सध्याचे फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पुनर्गठीत कर्जावर १२ ते १३ टक्के दराने जाचक व्याज आकारणी करत आहे.

ते पुढे म्हणाले की, आघाडी सरकारने शेतकर्यांनना ० ते २ टक्के दराने पीक कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु भाजप सरकारच्या काळात दुष्काळामुळे ज्या शेतकऱ्यांना कर्ज फेडणे शक्य झाले नाही त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे आवश्यक होते. कर्जमाफी मिळाली नाही तरी ० ते २ टक्के व्याज हा त्यांचा हक्क होता. मात्र तसे काही झाली नाही. यातून शेतकरी आत्महत्या वाढण्याची भिती असून त्या वाढल्या तर त्याचं पापही याच सरकारचं असणार आहे. अशी टीका अजित पवारांनी यावेळी केली.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी देखील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ आभास निर्माण करत आहेत. प्रकाश मेहतांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले, मात्र भाजप सरकारमधील अर्धा डझन मंत्र्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्वांवर कारवाई करणे गरजेच आहे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.