Ajit Pawar । पुणे : गेल्या काही दिवसांपासून रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. बीड दौऱ्यावर असताना अब्दुल सत्तारांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांनाच ‘दारू पिता का?’, असा प्रश्न विचारल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावरून वाद सुरू झाला आहे. या संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे.
या सर्व प्रकारांवर अजित पवारांनी भाष्य केलंय. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये ‘खोके’वरून सुरू असलेल्या वादावर ते म्हणाले, “सध्या सत्ताधारी पक्षाचे आमदार एकमेकांवर आरोप करतायत. खोक्यांचा उल्लेख करत आहेत. चौकशांची मागणी करत आहे. आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात असं काही घडलं नाही. मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असायला हवा.” इथे मंत्रीच जिल्हाधिकाऱ्यांना विचारतायत की ‘तुम्ही दारू पिता का?’ महाराष्ट्रात असं कधीच बघितलं नसल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय.
सत्ताधाऱ्यांनी मंत्र्यांना मार्गदर्शन करायला हवं, असं अजित पवार म्हणाले. “त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना जरा मार्गदर्शन करावं की कशापद्धतीने आणि काय विधानं केली पाहिजेत. आज महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचं ते प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांची अशी वक्तव्य आल्यानंतर सर्वसामान्य जनतेनं कुणाकडे अपेक्षेनं पाहावं? यासंदर्भात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी”, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.
पुढे ते म्हणाले, “१०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’चं गाजर दाखवलं. तेव्हाही मी म्हटलं की अजून शिधा पोहोचला नाही. शिधाच्या पिशव्यांवर आमदारांनी स्वत:चे फोटो छापून हौस भागवून घेतली. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांशिवाय कुणाचाही फोटो छापायचा नाही असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. इथे त्याचं उल्लंघन झालंय का हे पाहायला हवं”, असा मुद्दा अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar । “जे लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे, त्यांचे..”; अजित पवारांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
- Narayan Rane | ‘नारायण राणे यांची किंमत आजच्या घडीला चाराण्याचीच’
- Rohit Pawar । “…ही भाजपची काम करण्याची पद्धत”; ‘त्या’ प्रकरणावरून रोहित पवार यांचा हल्लाबोल
- Tata AirBus Project । शिंदे-फडणवीस सरकार गुजरातचे एजंट; नाना पटोले यांची बोचरी टीका
- Bachhu Kadu । “उद्या राजीनामा द्यावा लागला तरी बेहत्तर, आंडूपांडू थोडीच आहे?”; ‘त्या’ प्रकरणावरून बच्चू कडू भडकले