सत्ता नसल्याने आता निरंजनला देण्यासारखे माझ्याकडे तुला काही नाही : अजित पवार

मुंबई : स्थानिक राजकारण्यांकडून करण्यात येणाऱ्या कुरघोड्यांना कंटाळून काल निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला. डावखरे यांनी भाजपची वाट धरल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ‘राष्ट्रवादीत असताना पहिला युवक आमदार म्हणून विधान परिषदेवर संधी दिली. युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद दिले; पण आता सत्ता नाही. त्यामुळे माझ्याकडे तुला देण्यासारखे काही नाही,”या शब्दात पवार यांनी आमदार निरंजन डावखरे यांना निरोप देताना नाराजी व्यक्त केली.

दरम्यान,नुकताच निरंजन डावखरे यांनी विधान भवनात जाऊन सभापतींकडे राजीनामा सोपवला. पत्रकार परिषदेत बोलताना स्थानिक स्तरावरील नेत्यांनी सतत डावलल्याने व्यथित होतो. पक्षाच्या वरिष्ठांना सतत सांगूनही काही फरक पडत नव्हता. त्यामुळे मी राजीनामा देऊन भाजपप्रवेशाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेमकं काय म्हणाले अजित पवार ?
“पक्षाने काय कमी केले होते तुला. मतभेद असतील तर इतक्या टोकाचा निर्णय का घ्यायला हवा? तुला विधान परिषदेवर संधी दिली. युवक कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष केले. राज्यभरात तुला काम करण्याची संधी दिली. तुझ्यासारख्या युवकाचे नेतृत्व राज्यभरात पुढे यावे, हीच पक्षाची भूमिका होती. मात्र, आता सत्ता नाही. त्यामुळे माझ्याकडे तुला देण्यासारखे काही नाही,”