‘संभाजीराजेंना आंदोलन करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं’

ajit pawar - sambhajiraje - uddhav thackeray

पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जूनला रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. मराठा समाजच्या मागण्यांवर विचार नाही झाला तर पुण्यातून मंत्रालयावर लॉंगमार्च काढण्याचा थेट इशारा देखील खा. संभाजीराजे यांनी दिला आहे.

उद्या कोल्हापूर इथून या मूक आंदोलनाला सुरुवात होत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन होत आहे. या आंदोलनाविषयी अजित पवारांनी भाष्य केलं आहे. आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन संभाजीराजेंना केलं होतं, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

संभाजीराजे यांनी आंदोलन करण्याऐवजी त्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं. पण आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीत सर्वांना आहे. त्यांनी आंदोलन करावं पण करोना वाढणार नाही याची काळजी घेऊन करावं. असं अजित पवार म्हणाले आहेत.

त्याचबरोबर उद्या होणाऱ्या आंदोलनात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील तसंच हसन मुश्रीफ हेही सहभागी होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर उदयनराजे आणि संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे त्यावर येणाऱ्या राज्याच्या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

IMP