राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या आरोपाबाबत अजित पवार म्हणतात…

अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. येत्या 5 दिवसांच्या आत घोटाळ्यातील सबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर अजित पवार यांनी राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणातील आर्थिक घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. परळी शहरात झालेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, न्यायालयने 75 लोकांबाबतीत निकाल दिला आहे. त्या बँकेच्या एकाही लोन कमिटीला आणि एक्झिक्युटिव्ह कमेटीला मी हजर नाही. 75 लोकांपैकी भाजपचे हयात नसलेले मंत्री भाऊसाहेब फुंडकर देखील होते. शिवसेनेचे केंद्रातील माजी अर्थमंत्री यांचाही त्यात समावेश आहे. पण मीडिया मात्र फक्त अजित पवार अजित पवार करत आहे. काय माझ्याबद्दल त्यांना एवढे प्रेम आहे. या बँक प्रकरणात मी एक रुपयात सुध्दा मिंदा नाही हे जाहीर भाषणात सांगतो.

दरम्यान राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 75 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. 25 हजार कोटींचा हा घोटाळा आहे. यामध्ये अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नावांचा समावेश आहे. सुरींदर अरोरा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्देश देत पुढील पाच दिवसात गुन्हा दाखल करा असे म्हटले आहे.