fbpx

शिरोळेंनी जर पुण्याचा विकास केला तर उमेदवार का बदलला? – अजित पवार

ajit pawar and girish bapat

पुणे – सत्ताधारी भाजपने पुण्यात विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी पालकमंत्री गिरिश बापट यांना तिकिट दिलं या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील भाजपच्या राजकारणावर टीका केली आहे. पुण्याचा जर विकास केला असेल तर मग भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांची उमेदवारी का बदलली,’ असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सभेत केला आहे.

भाजपने उमेदवार निवडणुकीपूर्वी सर्व्हे केला होता त्या सर्व्हेनंतर अनिल शिरोळे यांच्या ऐवजी गिरीश बापट यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. पण आता याच उमेदवार बदलीवरून अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच या निवडणुकीत भाजपने धक्कातंत्राचा वापर करून अनिल शिरोळे यांच तिकीट कापलं असे म्हणले जात आहे.

मात्र अजित पवार यांच्या या टीकेवर गिरीश बापट यांनी अजित पवार यांना सडेतोड उत्तर दिल आहे. ‘पुण्याचा विचार करता उमेदवार बदलणं आणि विकास याचा संबंध नाही. अजित पवार यांनाही हे चांगलंच माहिती आहे,’ असं उत्तर भाजपचे पुणे मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिलं आहे.

दरम्यान, पुणे लोकसभेसाठी आता भाजपचे गिरीश बापट तर कॉंग्रेसचे मोहन जोशी असा सामना रंगणार आहे. प्रवीण गायकवाड यांचा पत्ता कट करून कॉंग्रेसने पुण्यात मोहन जोशी यांना उमेदवारी दिली आहे. जोशी यांना उमेदवारी देण्यात आल्याने प्रवीण गायकवाड समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गायकवाड हे तगडी लढत देवू शकत असताना देखील कॉंग्रेसकडून डावलण्यात आल्याने पुणे शहरात वेगवेगळ्या चर्चा उधाण आले आहे.