पुणे शहरातील आघाडीचे जागावाटप जाहीर, अजित पवारांनी केली घोषणा

टीम महाराष्ट्र देशा :संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही  एकाच टप्प्यात होणार आहे. २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी  होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची लगबग वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आघाडीचे पुणे शहरातील जागावाटप जाहीर झाले आहे. यासंबंधीची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. पुणे शहरातील 8 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 3 तर एक जागा मित्रपक्ष लढवणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पुण्यातील हडपसर, पर्वती, खडकवासला, वडगाव शेरी या जागा लढणार आहेत. तर शिवाजी नगर, कसबा, कंन्टोन्मेंट या जागा काँग्रेस लढवणार आहे. तसेच कोथरुडची जागा मित्रपक्ष लढवणार आहे. या सर्व जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या जागांवर विजय मिळवण्यासाठी आघाडीला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी ‘गेल्या काही दिवसांपासून आघाडी संदर्भात समविचारी असून जागावाटपाची चर्चा सुरु आहे. मतदानासाठी अवघा एक महिना उरला आहेत. त्यामुळे आपल्याला एक महिना जीवतोड मेहनत करावी लागणार आहे. आपल्या हातात एकच महिना आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी प्रचारात झोकून द्या असे आवाहनही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

महत्वाच्या बातम्या