पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्यात अजितदादा राबवणार ‘सांगली पॅटर्न’ ?

pcmc

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. २०१४ मध्ये राज्यासह देशात भाजपची सत्ता आल्यानंतर २०१७ च्या महापालिका निवडणुकांआधी अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता.

या नगरसेवकांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती. यामुळेच राष्ट्रवादीचा खास करून उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपने सत्तेचा झेंडा फडकावला. आता महापालिकेच्या निवडणूक जवळ आल्या असतानाच भाजपमधील नगरसेवकांचा नाराजीचा सूर वाढला आहे. तर, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यामुळे अजित पवार हे पुन्हा एकदा जास्त जोमाने या भागात कामाला लागले आहेत.

दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठीचा भाजपचे नितीन लांडगे व राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांनी अर्ज भरला आहे. शुक्रवार ( दि .०५ ) मार्च रोजी ही निवडणुक होणार असून आज वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती . त्यामुळे सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे अस्पष्ट आहे .

या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केले आहे. वाघेरे म्हणाले की, यावेळी आम्ही सांगली पॅटर्न पिंपरी चिंचवडमध्ये घडवून आणू. भाजपचे १२ ते १५ नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या