तिकीट द्या नाहीतर मी पक्ष सोडेन, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पवारांना इशारा

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षांतर केले आहे. आता तर पक्षातील नेत्यांनी पक्षाध्यक्षांना धमकी देण्याचे सत्र सुरु केले आहे. नंदुरबार मधील जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला धमकी दिली आहे. तिकीट न मिळाल्यास ज्या पक्षातून तिकीट मिळेल त्या पक्षात जाण्यास तयार असल्याची धमकी दिली आहे. त्यामुळे नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

राजेंद्र गावित यांनी आज शहादा इथे कार्यकर्ता मेळावा घेत तिकीट न मिळाल्यास ज्या पक्षातून तिकीट मिळेल त्यात जाण्याचा इशारा दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजेंद्र गावित यांनी शहादा-तळोदा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीला गावित यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.

२०१४ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचे मत विभाजन होऊन भाजप विजयी झाली होती. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसच्या पदमाकर वळवी यांचा 719 मतांनी पराभव झाला होता. तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राजेंद्र गावित यांनादेखील विजयी उमेदवारांपेक्षा 11590 मतं कमी मिळाली होती. अशातच दुसऱ्या क्रमांकावर याठिकाणी काँग्रेस उमेदवार राहिल्याने हा मतदारसंघ काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजेंद्र गावित यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.