अॅक्सिस बँकेचे ७४ लाख पळवणारा साथीदारांसह गजाआड

पुणे : एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली कॅश घेऊन गाडीसह फरार झालेल्या चालकाला त्याच्या साथीदारांसह पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून ७४ लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.पिंपळे सौदागर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम शाखेजवळून चालक ७४ लाख रूपयांची रक्कम साथीदारासह घेवून फरार झाला होता.

या प्रकरणातील आरोपींना वाकड पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे.याप्रकरणी मुख्य आरोपी रणजित धर्मराज कोरेकर असे या व्हॅन चालकाचे नाव आहे. तर त्रिंबक गणपती नहिराळे अमोल लक्ष्मण धुते विठ्ठल रामहरी जाधव अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर पूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ब्रिक्स इंटरनॅशनल या कंपनीची गाडी (एम.एच.१४, सीएक्स ५७११) रणजित कोरेकर चालवत होता. बुधवारी सकाळी ही गाडी डेक्कन येथून एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघाली. दुपारपर्यंत सात एटीएममध्ये पैसे भरण्यात आले. गाडीमध्ये सुरक्षा रक्षक, दोन कॅशियर आणि चालक असे चौघे होते.

दुपारी सव्वाएकच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आल्यानंतर सुरक्षारक्षक आणि कॅशियर एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी गेले असताना चालक रणजित कोरेकर याने गाडी घेऊन धूम ठोकली. यावेळी गाडीमध्ये ७४ लाख रुपयांची रोकड होती. भोसरी येथून चौघांनी सर्व कॅश ईटीऑस कारमध्ये ठेवून पळाले. बुधवारी रात्री उशिरा पळवून नेलेली व्हॅन भोसरी एमआयडीसी येथे एका कंपनीजवळ आढळून आली. मात्र, त्यामधील रोख रक्कम घेऊन चालक रणजित कोरेकर फरार झाला होता. गुरुवारी शिक्रापूर हद्दीत ज्या पेटीमध्ये कंपनीने पैसे भरून ठेवले होते, ती पैशांची मोकळी पेटी सापडली.

याप्रकरणी वाकड पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले, व त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता हा गुन्हा उघडकीस आला. या प्रकरणाचा ७२ तासांमध्ये तपास करत आरोपींना गजाआड करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे.

Comments
Loading...