अहमदनगर : शिवसैनिक दुहेरी हत्याकांड , स्थानिक विशेष तपास पथक बरखास्त

crime

अहमदनगर/प्रशांत झावरे :- संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या व अहमदनगर जिल्हा गुन्हेगारीचे आगार बनत चालले असल्याची सर्वच बाजूनी जाहीर टीका होणाऱ्या अहमदनगर मधील केडगाव येथे महानगरपालिका पोटनिवडणुक निकालानंतर झालेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर तपासासाठी तयार करण्यात आलेले स्थानिक अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशाने बरखास्त करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास आता केसरकर यांच्याच आदेशाने नवीन विशेष तपास पथक मालेगाव येथील पोलीस उपअधीक्षक श्री.पोतदार यांच्या नेतृत्वाखाली करणार आहे.

आतापर्यंत होत असलेल्या तपासावर आक्षेप घेत मयत वसंत ठुबे व संजय कोतकर यांचे कुटुंबीय कोतकर यांच्याच घरी उपोषणास बसले होते. आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी दुपारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशाने निर्णय झाल्याने शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन ठुबे व कोतकर यांच्या कुटुंबियांचे उपोषण सोडण्यात आले.

अहमदनगर मधील केडगाव येथील संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या या दुहेरी हत्याकांडातील सर्वच आरोपींना व त्यांना मदत करणाऱ्या व कट रचणाऱ्या सर्वांनाच अटक करून, तपासी अधिकारी बदला व आतापर्यंत तपासात हलगर्जीपणा केल्यामुळे अधिकार्यांच्यावर पण कारवाई करावी, त्यानंतरच आम्ही उपोषण मागे घेऊन असे संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांनी सांगून उपोषणाला सुरुवात केली होती. उपोषण काळात दोनही कुटूंबियांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. चौथ्या दिवशी कोतकर व ठुबे कुटूंबियांची अवस्था अतिशय बिकट झाल्याने प्रशासनावर मोठा दबाव येऊन उपोषण सोडविण्याचे आव्हान निर्माण झाले होते. तसेच ठुबे व कोतकर कुटुंबीयांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे व कोतवाली पोलीस ठाणे निरीक्षक रमेश रत्नपारखी यांना पण हटविण्याची मागणी केली होती.

सोमवारी अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार व पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी उपोषणकर्ते ठुबे व कोतकर कुटूंबियांची भेट घेऊन उपोषण सोडविण्याबाबत चर्चा केली होती. परंतु ठुबे व कोतकर कुटुंबीय सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडण्यास तयार नव्हते. मंगळवारी दुपारपर्यंत कोणीही अधिकारी उपोषणस्थळी आले नव्हते, परंतु दुपारी गृह विभागाने गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशाने जुनी एसआयटी बरखास्त केल्याचे व मालेगावचे पोलीस उपअधीक्षक श्री.पोतदार यांची एसआयटी प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचे कळविले. त्यानंतर शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड व शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या हस्ते ठुबे व कोतकर कुटुंबीयांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले.