शिर्डीत भाविक-सुरक्षा रक्षकांत हाणामारी

बुधवारी संध्याकाळी भाविक व साई संस्थांनचे सुरक्षा रक्षक यांच्यात जोरदार हाणामारी होऊन त्यात एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत प्रकरण चिघळले. या हाणामारीत ३ भाविक व ३ सुरक्षा कर्मचारी असे ६ जण जखमी झाले असून आपसात तडजोड झाल्याने पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही मात्र या घटनेनंतर शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे.

शिर्डीतील वाढती गुन्हेगारी तसेच संस्थान परिसरातील कर्मचाऱ्यांची दादागिरी यामुळे येथे नेहमीच खटके उडताना दिसतात. तसाच काहीसा प्रकार आज घडला. दत्त जयंती उत्सवासाठी मुंबईच्या कांदिवली येथून साई भक्तांची पालखी शिर्डीला आली होती. साई संस्थान प्रसादालयाच्या प्रांगणात संध्याकाळी ४.३० वाजता पालखीसोबत आलेल्या एका भाविकाची मुलगी बॅरिगेट्सवर बसली होती. तिला खाली उतरण्यास सांगूनही ती न उतरल्याने सुरक्षा रक्षकाने मुलीला ढकलले. त्यात मुलीच्या तोंडाला मार लागला. मुलीने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितल्यावर पालखीतील अन्य भाविकांनी सुरक्षा रक्षकाला जाब विचारला. त्यातूनच बाचाबाची होऊन हाणामारी झाली. सुरक्षा रक्षकाला मारहाण झाल्याने अन्य कर्मचारी जमा झाले. त्यांनीही मग पालखीतील लोकांना मारहाण केली. त्यातच इतर भाविकही वादात पडल्याने वाद अधिकच चिघळला. पालखीतील भाविक आणि सुरक्षा रक्षक यांच्या सुमारे अर्धा तास तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.