नगरमध्ये विखेंची प्रतिष्ठा पणाला, संग्राम जगताप रोखणार का ‘सुजय’चा विजय ?

sangram jagtap and sujay vikhe

टीम महाराष्ट्र देशा: अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिलरोजी मतदान पार पडणार आहे, तत्पूर्वी ५ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत, रंजक सामना रंगलेल्या अहमदनगरमध्ये आज भाजप तसेच राष्ट्रवादीने रॅली आणि सभांचा धडाका लावला आहे, पुत्रासाठी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप ‘सुजय’चा विजय रोखण्यासाठी रणनीती आखत आहेत.

अहमदनगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीने शेवटपर्यंत कॉंग्रेसला सोडली नाही, त्यामुळे कॉंग्रेस नेते तसेच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला, शरद पवार यांनी देखील धूर्तखेळी करत नगरच्या राजकारणाचे चाणक्य समजले जाणारे भाजप आ शिवाजी कर्डिले यांचे जावई आ संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली. संग्राम यांच्या उमेदवारीने कर्डिलेंची कोंडी झाली आहे. तर पुत्र निवडणूक लढवत असताना देखील राधाकृष्ण विखे पाटील यांना जाहीर प्रचार करता आला नाही.

सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, बबनराव पाचपुते, माजी मंत्री अनिल राठोड, आ.शिवाजी कर्डीले, यांच्यासह मतदारसंघातील आमदारांनी सभा घेतल्या आहेत. सुजय यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच बहुतांश भागामध्ये नागरिकांशी संपर्क केला होता.

राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, यांच्यासह पक्षाच्या बड्या नेत्यांनी सभा घेतल्या आहेत. पिता जरी विरोधात असला तरी पतीसाठी संग्राम जगताप यांच्या पत्नीने देखील मतदारसंघ धुंडाळला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट विधानसभा, विद्यमान आमदार

अहमदनगर शहर – संग्राम जगताप, राष्ट्रवादी

श्रीगोंदा – राहुल जगताप, राष्ट्रवादी

कर्जत जामखेड – प्रा. राम शिंदे, भाजप

शेवगाव – मोनिका राजीव राजळे, भाजप

राहुरी – शिवाजी कर्डिले, भाजप

पारनेर – विजयराव औटी, शिवसेना

एकूण मतदारांची संख्या १८ लाख ३१ हजार