नगर दक्षिण मध्ये काटे की टक्कर , पवारनिती यशस्वी होणार का ?

blank

स्वप्नील भालेराव /अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या चर्चेला सुरुवात झाल्यापासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहीला आहे. या चर्चेसाठी कारण सुद्धा तसेच आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव व कै.बाळासाहेब विखे पाटील नातु डॉ.सुजय विखे पाटील यांनी मागील तीन वर्षांपासून या भागावर आपले लक्ष केंद्रित करुन महिला महोत्सव, आरोग्य शिबिर यासारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुर्ण मतदारसंघ पिंजून काढला. नगर दक्षिण मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला असताना सुद्धा मीच लोकसभेचा उमेदवार असणार हे त्यांनी वेळोवेळी जाहीर केले. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेतृत्वानेही ही जागा राष्ट्रवादीच लढणार असे वेळोवेळी जाहीर करुन ही जागा प्रतिष्ठेची केली. जुन्या विखे-पवार संघर्षाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार का मिटणार ? अशी चर्चा असतानाच पवार-विखे घराण्यात आरोप प्रत्यारोप वाढु लागले व सुजय विखेंनी काँग्रेसला राम राम करत भाजपाचे कमळ हाती घेतले.

मागिल दोन दिवसात राष्ट्रवादी व भाजपाने आपापले उमेदवार जाहीर करुन कोण उमेदवारी करणार या चर्चेला पूर्णविराम दिला. भाजपाकडुन विद्यमान खा.दिलीप गांधी व डॉ.सुजय विखे यांची तिकिटासाठी चढाओढ असताना भाजप नेतृत्वाने विखेंना पसंती दिली. तत्पूर्वी राष्ट्रवादीने डॉ.विखे हेच भाजपाचे उमेदवार गृहीत धरुन आपली रणनिती आखण्याचे काम केले. राष्ट्रवादीकडुन आ.अरुण जगताप, प्रताप ढाकणे, प्रशांत गडाख, दादा कळमकर, अनुराधा नागवडे, निलेश लंके यांची नावे चर्चेत असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या आग्रहाखातर मा. महापौर व नगर शहराचे विद्यमान आ.संग्राम जगताप यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. आ.संग्राम जगताप तरुण व आक्रमक नेतृत्व आहे, त्याचबरोबर ते भाजपाचे आ.शिवाजी कर्डिलेंचे जावई आहेत. आ.कर्डिले यांची नगर जिल्ह्यात किंगमेकर अशी ओळख आहे, राष्ट्रवादीने कर्डिले जगतापांना मदत करतील या उद्देशानेच जगतापांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर आ.जगतापांचे नगर जिल्ह्यात असलेले सर्वपक्षीय नाते संबंध ही सुद्धा त्यांची जमेची बाजू आहे. बलाढ्य सुजय विखेंच्या विरोधात तरुण आमदार संग्राम जगताप यांना दिलेली उमेदवारी हा राष्ट्रवादीचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. त्यामुळे नगर दक्षिण मध्ये पुन्हा एकदा पवार-विखे संघर्ष नक्कीच पाहायला मिळेल.

नगरमध्ये विखे आणि जगताप यांच्यात सरळ लढत होत असली तरी शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर हे सुद्धा अपक्ष म्हणून मैदानात उतरत आहेत. त्यांना कोणताही राजकीय वारसा, राजकीय पार्श्वभूमी नसली तरीही विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या मनात घर तयार केले आहे, त्यामुळे ते सुद्धा कडवी झुंज देऊ शकतात. दोन्ही पक्षांनी तरुण व उच्च शिक्षित उमेदवार दिले आहेत. सुजय विखे डॉक्टर असुन संग्राम जगताप हे वाणिज्यमध्ये पदवीधर त्याचबरोबर संजीव भोर हे सुद्धा इंजिनिअर आहेत.

विखे यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात असुन सहा पैकी चार आमदार हे युतीचे आहेत ही त्यांची जमेची बाजु आहे. जुने भाजप कार्यकर्ते विखेंना किती साथ देतात हेही महत्त्वाचे आहे. तसेच दिलीप गांधी यांची नाराजी दुर करण्यात विखे यशस्वी होतात की नाही हेही पाहणे महत्वाचे ठरेल. काँग्रेसच्या विखे गटाबरोबरच कर्जत मधुन ना.राम शिंदे, पाथर्डीतुन आ.राजळे, राहुरीतुन आ.कर्डिले, पारनेरमधुन आ.औटीं, नगरमधुन अनिल राठोड यांची विशेष ताकद त्यांच्या पाठीशी आहे.

आ.संग्राम जगताप हे नगर शहराचे आमदार असुन त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा तालुक्यात आहे. त्यांचे वडिल आ.अरुण जगताप यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मतदारसंघात त्यांचे नातेवाईक जास्त असल्याने त्यांना प्रचार करणे सोपे जाणार आहे. आ.जगताप यांच्या पाठीशी पारनेर मधुन सुजित झावरे, निलेश लंके, श्रीगोंद्यातुन आ.राहुल जगताप, शेवगावमधुन घुले बंधु यांची ताकद आहे. राष्ट्रवादी बरोबरच काँग्रेसच्या थोरात गटाची त्यांना मदत होणार आहे. नाराज दिलिप गांधी समर्थक, भाजपचे आमदार कर्डिले, आ.राजळे यांचीही मदत त्यांना मिळु शकते.

वर वर जरी विखे-जगताप अशी लढत वाटत असली तरी अप्रत्यक्ष पवार-विखे अशीच लढत होणार आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. तुल्यबळ लढत होणार असल्याने मतदारसंघात नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांनाही मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन होईल अशीच चर्चा आहे.