नगर शिवसैनिक हत्या प्रकरण: पोलीस निरीक्षक परमार निलंबित

अहमदनगर: केडगावचे शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे हत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र काल पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतली असती तर ही घटना घेतली नसती असा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आता हलगर्जीपणाचा ठपका ठेवत कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अभय परमार यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच पोलीस उपअधीक्षक अक्षय शिंदे यांच्या चौकशीचे आदेश गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत.

शनिवारी सायंकाळी सहा वाजता केडगाव येथील सुवर्भण नगर येथे भर चौकात संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी सुवर्णनगर येथे दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर संतप्त जमावाने पोलीस वाहनांवरही दगडफेक केली होती. मृत संजय कोतकर यांनी आपल्याला धमक्या येत असल्याची तक्रार पोलिसांमध्ये केली होती. मात्र कोतकर यांच्या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याची तक्रार स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

आज दुपारच्या सुमारास शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अहमदनगर येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी उपअधीक्षक अक्षय शिंदे आणि निरीक्षक परमार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. तसेच या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती.

You might also like
Comments
Loading...